फायब्रॉइडचा मराठीत अर्थ: कारणे, गंभीर आणि उपचार

Last updated: February 20, 2026

Overview

“गर्भाशयात गाठ आहे” हे शब्द ऐकताच अनेक महिलांच्या मनात शस्त्रक्रिया किंवा आरोग्याबद्दल भीती निर्माण होते. खरं तर fibroids meaning in marathi कर्करोग नसलेल्या गर्भाशयातील गाठी असतात. त्या गर्भाशयाच्या आत किंवा आजूबाजूला तयार होतात आणि त्यांचा आकार छोट्या वाटाण्यापासून मोठ्या खरबुजाएवढा असू शकतो. हा त्रास खूप सामान्य आहे, प्रजननक्षम वयात 40 ते 80% महिलांमध्ये कधी ना कधी फायब्रॉइड्स आढळतात. अनेकदा त्यांची लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे महिलांना कळतही नाही.

मात्र काही महिलांमध्ये फायब्रॉइड्समुळे पाळीचा जास्त रक्तस्राव, पोटात जडपणा, पाठदुखी, किंवा पाळी अनियमित होणे अशी लक्षणे दिसू शकतात. म्हणून फायब्रॉइड्स कधी फक्त निरीक्षणाने चालतात आणि कधी उपचार आवश्यक असतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

युटेराईन फाइब्रॉइड्स म्हणजे काय?

फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या आत किंवा आजूबाजूला तयार होणाऱ्या सामान्य नॉन-कॅन्सरस गाठी. यांचे कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण 1% पेक्षाही कमी असते, म्हणजेच हे अत्यंत दुर्मिळ आहे. या गाठी प्रामुख्याने मसल टिश्यूपासून बनलेल्या असल्यामुळे त्या कडक वाटतात. मेडिकल भाषेत त्यांना लायोमायोमा (Leiomyoma) असे म्हणतात. या फायब्रॉइड्सचा आकार हळूहळू वाढू शकतो. काही महिलांमध्ये एकच फायब्रॉइड असतो, तर काहींमध्ये एकापेक्षा जास्त फायब्रॉइड्स तयार होऊन ते एकत्र गटामध्येही दिसू शकतात. मात्र ही वाढ अचानक किंवा झपाट्याने होत नाही.

अनेक महिलांमध्ये फायब्रॉइड्स लहान असतात किंवा लक्षणं देत नाहीत, त्यामुळे त्यांची माहिती तपासणीदरम्यानच समजते. फायब्रॉइड्समुळे होणारे त्रास हे मुख्यतः गाठीची जागा, आकार आणि ती वाढतेय की स्थिर आहे यावर अवलंबून असतात. काही महिलांमध्ये त्यामुळे पाळीचे त्रास, पोटात जडपणा जाणवू शकतो, आणि काही विशिष्ट परिस्थितीत गर्भधारणेत अडचण येण्याची शक्यताही असते.

फाइब्रॉइड्स कधी होतात आणि ते किती सामान्य आहेत?

फाइब्रॉइड्स साधारणपणे महिलांच्या प्रजनन काळात तयार होतात आणि 30 ते 50 वयाच्या दरम्यान जास्त दिसतात. पहिली पाळी सुरू होण्यापूर्वी ते फारच क्वचित आढळतात. मेनोपॉजनंतर हार्मोन्स कमी होत असल्यामुळे अनेक वेळा त्यांची वाढ थांबते आणि काही केसेसमध्ये त्या लहानही होतात.

फाइब्रॉइड्स हा महिलांमध्ये आढळणारा खूप सामान्य त्रास आहे. अनेक अभ्यासांनुसार प्रजनन वयात 40% ते 80% महिलांमध्ये कधी ना कधी फायब्रॉइड्स आढळू शकतात. मात्र बहुतेक महिलांना लक्षणं नसतात, त्यामुळे उपचारांची गरजही भासत नाही. फक्त काही महिलांमध्ये पाळीचा जास्त रक्तस्राव, पेल्विक वेदना किंवा अस्वस्थता दिसते, म्हणून प्रत्येक महिलेमध्ये अनुभव वेगळा असू शकतो.

गर्भाशयातील गाठीचे प्रकार कोणते?

फाइब्रॉइड्स हे गर्भाशयाशी संबंधित गाठी आहेत. त्या गर्भाशयाच्या कुठल्या भागात तयार होतात, यावरून त्यांचे प्रकार ठरतात.

1. इंट्राम्युरल फाइब्रॉइड्स

हा सर्वात सामान्य प्रकार आहे. या गाठी गर्भाशयाच्या भिंतीच्या आत तयार होतात. यांचा आकार हळूहळू वाढू शकतो आणि भिंत जास्त प्रमाणात फायब्रॉइड्सने भरली गेल्यास पाळीचा त्रास, पोटात गोळे, पेल्विक वेदना किंवा पाळी अनियमित होणे असे त्रास दिसू शकतात.

2. सबम्युकॉझल फाइब्रॉइड्स

या गाठी गर्भाशयाच्या आतल्या आवरणाखाली तयार होतात आणि म्हणूनच त्या जास्त लक्षणे देणाऱ्या मानल्या जातात. यामुळे जास्त रक्तस्राव, वेदना, पेल्विक दुखणं, कधी कंबरदुखी आणि ॲनिमिया होऊ शकतो. आकार मोठा असेल तर काही महिलांमध्ये गर्भधारणेत अडचण किंवा गर्भ टिकवण्यात समस्या येऊ शकते.

3. सबसीरोसल फाइब्रॉइड्स

या गाठी गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला (सेरोसा खाली) तयार होतात आणि बाहेरच्या दिशेने वाढतात. आकार वाढल्यास त्या मूत्राशय/आतडे यांवर दाब देऊ शकतात, त्यामुळे पेल्विक वेदना, पोट फुगल्यासारखं वाटणं, वारंवार लघवी लागणं किंवा लघवी रोखता न येणं असे त्रास होऊ शकतात. नर्व्हवर दाब आला तर कंबरदुखी/पायात जाणारी वेदनाही जाणवू शकते.

4. पेडन्क्युलेटेड फाइब्रॉइड्स

या गाठी थेट भिंतीत न वाढता देठासारख्या रचनेवर (peduncle) वाढतात. देठ आतल्या बाजूला असेल तर पेडन्क्युलेटेड सबम्युकॉझल, आणि बाहेरच्या बाजूला असेल तर पेडन्क्युलेटेड सबसीरोसल म्हणतात. गाठ मोठी झाली तर आजूबाजूच्या अवयवांवर दाब येऊ शकतात. देठाला वळण आलं तर अचानक तीव्र वेदना होऊ शकतात, कारण गाठीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो.

फाइब्रॉइड्स होण्याची कारणे काय आहेत?

फाइब्रॉइड्स का होतात याचं एक ठोस कारण आजही माहीत नाही. मात्र संशोधनातून असं दिसून आलं आहे की काही गोष्टी फाइब्रॉइड्सच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात..

  • स्त्री हार्मोन्स: हार्मोन्स, विशेषतः एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन, हे फाइब्रॉइड्सच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. या हार्मोन्सची पातळी जास्त असताना फाइब्रॉइड्सचा आकार वाढण्याची शक्यता असते. म्हणून प्रजनन वयात फाइब्रॉइड्स जास्त दिसतात आणि मेनोपॉज नंतर अनेक वेळा ते लहान होतात.
  • हेरेडिटरी: काही महिलांमध्ये कुटुंबात फाइब्रॉइड्स असतील तर धोका जास्त असतो.
  • ओबेसिटी: वजन जास्त असणे हेही एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. शरीरातील चरबीच्या पेशी जास्त प्रमाणात एस्ट्रोजेन तयार करतात, ज्यामुळे फाइब्रॉइड्सची वाढ होण्याची शक्यता वाढते. ओबेसिटीमुळे शरीरात इन्फ्लेमेशन आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढू शकते, जे फाइब्रॉइड्सच्या विकासाला मदत करू शकते.
  • लो विटॅमिन D: विटॅमिन D ची कमतरता असलेल्या महिलांमध्ये फाइब्रॉइड्स जास्त आढळतात, असं काही अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे. विटॅमिन D ला ॲन्टी-फाइब्रॉइड इफेक्ट असल्याचं मानलं जातं.
  • निष्क्रिय जीवनशैली: फाइब्रॉइड्सशी थेट संबंध तर नाही मात्र नियमित हालचाल नसेल, तर फाइब्रॉइड्स होण्याचा धोका थोडा वाढू शकतो, असं काही अभ्यासांमधून दिसून आलं आहे.

गर्भाशयातील गाठीची लक्षणे कोणती?

सर्व महिलांमध्ये फाइब्रॉइड्सची लक्षणे दिसतीलच असे नाही. बर्याच वेळा कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र काही महिलांमध्ये गाठीच्या आकारानुसार खालील त्रास दिसू शकतात:

1. मासिक पाळीशी संबंधित लक्षणे:

  • पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्राव होणे किंवा पाळी जास्त दिवस चालणे.
  • पाळीत रक्ताच्या मोठ्या गुठळ्या (Blood Clots) जाणे.
  • पाळीच्या दरम्यान पोटात तीव्र गोळे येणे किंवा कंबरदुखी.

2. ॲनिमिया (रक्तक्षय)

जास्त रक्तस्रावाचा परिणाम, दीर्घकाळ जास्त रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण (हीमोग्लोबिन) कमी होते, ज्याला ॲनिमिया म्हणतात. जर तुम्हाला खालील लक्षणे दिसत असतील, तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते:

  • अतिशय थकवा आणि कमजोरी: साधी कामे करतानाही लवकर थकवा येणे.
  • श्वास लागणे: थोडं चाललं तरी धाप लागणे किंवा हृदयाची धडधड वाढणे.
  • नखे आणि त्वचेचा फिकटपणा: नखे पांढरट दिसणे किंवा चेहरा निस्तेज (Pale) पडणे.
  • चक्कर येणे: बसल्या जागी किंवा उठताना वारंवार चक्कर येणे.

3. दाबामुळे जाणवणारी लक्षणे:

  • मूत्राशयावर दाब: वारंवार लघवीला जावे लागणे किंवा लघवी रोखण्यास त्रास होणे.
  • आतड्यावर दाब: बद्धकोष्ठता (Constipation) किंवा शौचाच्या जागी दाब जाणवणे.
  • पोट फुगणे: गर्भाशयातील गाठी मोठी असल्यास पोट बाहेर आल्यासारखे दिसणे किंवा सतत जडपणा जाणवणे.

कधी तात्काळ डॉक्टरांना भेटायला हवं?

काही वेळा फायब्रॉइड्ससोबत दिसणारी लक्षणं तत्काळ लक्ष देण्यासारखी असू शकतात. खालीलपैकी काहीही लक्षण जाणवलं तर उशीर न करता ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या:

  • अतिशय जास्त रक्तस्राव (दर 1-2 तासांनी पॅड बदलावा लागणे) किंवा रक्तस्रावासोबत चक्कर येणे/बेशुद्ध होणे
  • अचानक तीव्र पेल्विक/पोटदुखी, विशेषतः वेदना सतत वाढत असेल तर
  • पेल्विक वेदनेसह ताप, दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज किंवा खूप अशक्तपणा
  • ॲनिमियाची गंभीर लक्षणं: खूप थकवा, श्वास लागणे, हृदयाची धडधड वाढणे, चेहऱ्यावर पांढरटपणा/पीलसरपणा
  • गर्भधारणेदरम्यान रक्तस्राव, तीव्र वेदना, किंवा पोटात सतत ताण/खिंचाव जाणवणे
  • लघवी अडखळणे/रुकणे, खूप कष्टाने लघवी होणे, किंवा पोटात तीव्र दाब व अस्वस्थता

गर्भाशयातील गाठीचे निदान कसे केले जाते?

आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की फाइब्रॉइड्समुळे होणारे त्रास हे गाठीचा आकार आणि ती गर्भाशयाच्या कुठल्या भागात आहे यावर अवलंबून असतात. तुमची लक्षणे समजून डॉक्टर काही तपासण्या करून फाइब्रॉइड्सचं निदान करतात. या तपासण्यांमध्ये प्रामुख्याने:

  • पेल्विक तपासणी: डॉक्टरांकडून केली जाणारी प्राथमिक आणि साधी तपासणी. यात हाताने पोटाचा खालचा भाग तपासून गर्भाशयाची स्थिती/आकार अंदाज घेतला जातो.
  • अल्ट्रासाऊंड: सर्वात सामान्य आणि वेदनारहित तपासणी. गरजेनुसार ट्रान्सॲब्डॉमिनल (पोटावरून) किंवा ट्रान्सव्हजायनल (योनीमार्गातून प्रोब) पद्धतीने केली जाते.
  • MRI (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग): डॉक्टरांना जेव्हा खूप स्पष्ट आणि सविस्तर माहिती हवी असते, विशेषतः ऑपरेशन किंवा प्रगत उपचारांपूर्वी, तेव्हा MRI केली जाते. यामुळे फायब्रॉइड्सचा नेमका आकार, संख्या आणि जागा समजते आणि उपचार ठरवायला मदत होते. काही वेळा इतर गंभीर शक्यता तपासायलाही उपयोगी.
  • सोनोहिस्टेरोग्राफी: गर्भाशयाच्या तोंडातून छोटा कॅथेटर घालून स्टेराइल सलाईन सोडली जाते, त्यामुळे गर्भाशय थोडं फुगून आतली रचना स्पष्ट दिसते. असामान्य रक्तस्राव, वंध्यत्व, वारंवार गर्भपात यामागचं कारण समजायला मदत होते.
  • हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी (HSG): कॉन्ट्रास्ट डाई वापरून केली जाणारी एक्स-रे तपासणी. यात गर्भाशयाची पोकळी आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा आहे की नाही हे तपासलं जातं.
  • हिस्टेरोस्कोपी: गर्भाशयाच्या तोंडातून हिस्टेरोस्कोप नावाची बारीक नळी आत घालून गर्भाशय थेट पाहता येतं. गरज असल्यास याच प्रक्रियेत फायब्रॉइड काढणं/छोटं ऑपरेशनही करता येतं (तपासणी + उपचार एकाच वेळी).

फायब्रॉइड्ससाठी उपचार कोणते?

सगळ्या फायब्रॉइड्ससाठी उपचार लागतातच असं नाही. प्रत्येक महिलेसाठी उपचार वेगळा असतो. डॉक्टर साधारणपणे लक्षणांची तीव्रता, फायब्रॉइडची जागा व आकार, वय, आणि पुढे गर्भधारणा हवी आहे का यावरून उपचार ठरवतात.

औषधोपचार

  • औषधं फायब्रॉइड्स काढून टाकत नाहीत, पण त्यामुळं होणारा जास्त रक्तस्राव, वेदना आणि इतर लक्षणं कमी करायला मदत करतात.
  • हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह- काही महिलांमध्ये हार्मोन्स कंट्रोल करून पाळीचे त्रास आणि वेदना कमी करतात.

कमी शस्त्रक्रियेचे उपचार

  • युटेरिन फायब्रॉइड एम्बोलायझेशन (UFE)- हा नॉन-सर्जिकल उपचार आहे. यात फायब्रॉइड्सला जाणारा रक्तपुरवठा कमी केला जातो, त्यामुळे त्या हळूहळू लहान होतात.
  • एमआरआय गाईडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड (MRgFUS)- हा कट न करता केला जाणारा उपचार आहे. यात हाय इंटेन्सिटी अल्ट्रासाऊंड वेव्ह्ज वापरून फायब्रॉइड टिश्यू नष्ट केला जातो.
  • रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन- या पद्धतीत उष्णतेचा वापर करून फायब्रॉइड टिश्यू नष्ट केला जातो. ही प्रक्रिया बहुतेक वेळा अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआयच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.

शस्त्रक्रियेचे उपचार

  • मायोमेक्टॉमी- या शस्त्रक्रियेत फाइब्रॉइड्स काढले जातात आणि गर्भाशय जपलं जातं. ही प्रक्रिया हिस्टेरोस्कोपिक, लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक किंवा ओपन सर्जरी पद्धतीने केली जाऊ शकते.
  • हिस्टेरेक्टॉमी- हा शेवटचा पर्याय मानला जातो. जेव्हा फायब्रॉइड्स खूप जास्त असतात आणि इतर उपचार उपयोगी पडत नाहीत, तेव्हा गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला जातो.

वंध्यत्व, गर्भधारणा आणि फायब्रॉइड्स

फायब्रॉइड्स हे वंध्यत्वाचे एक कारण असू शकतं, पण प्रत्येक फायब्रॉइड प्रजननक्षमतेत अडथळा आणतोच असं नाही. अनेक महिलांना फायब्रॉइड्स असूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते. मात्र काही केसेसमध्ये फायब्रॉइड्स फॅलोपियन ट्यूब अडवतात, गर्भाशयाच्या आतल्या पोकळीचा आकार बदलतात, किंवा भ्रूण बसायच्या जागेवर परिणाम करतात, तेव्हा गर्भधारणेत अडचण येऊ शकते. काही वेळा फायब्रॉइड्समुळे गर्भाशयात जाणारा रक्तपुरवठा कमी होऊन भ्रूण नीट बसणं किंवा वाढणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे तपासणी केल्याशिवाय घाबरण्याचं कारण नसतं.

गर्भधारणेदरम्यान बहुतेक वेळा फायब्रॉइड्समुळे त्रास होत नाही, विशेषतः गाठी लहान असतील तर. फायब्रॉइड वाढला तर तो बहुतेकदा पहिल्या 12 आठवड्यांत दिसतो. मात्र मोठ्या फायब्रॉइड्समुळे काही महिलांमध्ये पोटदुखी, बाळाची स्थिती बदलणं, प्रिमॅच्युअर बर्थ, सी-सेक्शनची शक्यता, किंवा क्वचित प्रसंगी गर्भपाताचा धोका वाढू शकतो.

निष्कर्ष

फायब्रॉइड्स ही गर्भाशयात होणारी अतिशय सामान्य, कर्करोग नसलेली वाढ आहे आणि त्यांचा परिणाम प्रत्येक महिलेनुसार बदलतो. त्यांच्या आकार, संख्या आणि स्थानावर बरेच काही अवलंबून असते, म्हणूनच काही महिलांना ते कधीच लक्षात येत नाहीत, तर काहींना मासिक पाळी, वेदना किंवा प्रजननक्षमतेशी संबंधित लक्षणे जाणवू शकतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, फायब्रॉइड्स शांत राहतात आणि फक्त नियमित तपासणी दरम्यानच आढळतात. चांगली गोष्ट म्हणजे फायब्रॉइड्स म्हणजे नेहमी ऑपरेशन, वंध्यत्व किंवा गंभीर आजार असंच नसतं. योग्य निरीक्षण, औषधं किंवा साध्या उपचारांनी ते सांभाळता येतात. जर जास्त रक्तस्त्राव, सतत वेदना किंवा तुमच्या शरीरात अचानक बदल यासारखी लक्षणे दिसू लागली तर लवकर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास मोठा फरक पडू शकतो. वेळेवर निदान केल्याने योग्य उपचार निवडण्यास आणि फायब्रॉइड्स शांतपणे आणि प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत होते.

CTA- फाइब्रॉइड्स किंवा गर्भधारणेशी संबंधित शंका असतील, तर योग्य मार्गदर्शनासाठी Indira IVF मधील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर- ही ब्लॉगमधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे. कोणताही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रत्येक महिलेसाठी फायब्रॉइड्सचा उपचार वेगळा असतो का?

 

होय. उपचार हे वय, लक्षण, फायब्रॉइड्सचा आकार आणि जागा, तसेच भविष्यात गर्भधारणा हवी आहे की नाही यावर अवलंबून असतात. त्यामुळे एकाच प्रकारचा उपचार सगळ्यांसाठी योग्य नसतो.

फायब्रॉइड्स वारंवार परत का येतात?

 

फायब्रॉइड्सची वाढ प्रामुख्याने एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सवर अवलंबून असते. फायब्रॉइड्स काढल्यानंतरही शरीरातील हार्मोन्सची स्थिती बदललेली नसेल, तर नवीन फायब्रॉइड्स तयार होण्याची शक्यता राहते.

फायब्रॉइड्समुळे नेहमी वंध्यत्व होतं का?

 

नाही. फायब्रॉइड्स म्हणजे वंध्यत्वच असं नाही. काही फायब्रॉइड्समुळे गर्भधारणेत अडचण येऊ शकते, पण अनेक महिलांना फायब्रॉइड्स असूनही सहज गर्भधारणा होते.

सगळ्या फायब्रॉइड्ससाठी उपचार लागतात का?

 

नाही. अनेक फायब्रॉइड्स लहान असतात आणि त्रास देत नाहीत, त्यामुळे त्यासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसते. अशा वेळी फक्त निरीक्षण पुरेसं असतं.

फायब्रॉइड्स असतील तर काय खावे किंवा काय टाळावे?

 

फायब्रॉइड्स बरे करण्यासाठी असा ठराविक डाएट नाही, पण योग्य खाण्याने शरीर निरोगी ठेवायला आणि लक्षणं कमी करायला मदत होते. भाजीपाला, फळं, पूर्ण धान्य आणि पुरेसं प्रोटीन असलेला आहार हार्मोन्स संतुलित ठेवायला मदत करतो. पाळीचा जास्त रक्तस्राव होत असेल तर आयरनयुक्त पदार्थ घेणं उपयोगी ठरतं. फार तेलकट, तळलेलं, जंक फूड, जास्त साखर आणि मद्यपान शक्यतो टाळावं.

**Disclaimer: The information provided here serves as a general guide and does not constitute medical advice. We strongly advise consulting a certified fertility expert for professional assessment and personalized treatment recommendations.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer