मराठीत फॉलिक्युलर स्टडी (follicular study in marathi): प्रक्रिया आणि रिपोर्ट

Last updated: September 15, 2026

Overview

अंडाशयातील फॉलिकल्स या अंडाशयाच्या आत असलेल्या लहान, द्रवाने भरलेल्या रचना आहेत, ज्यात अपरिपक्व अंडी असतात. स्त्रीच्या दोन्ही अंडाशयांमध्ये अनेक फॉलिकल्स असतात आणि प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात, हार्मोन्सच्या प्रभावाखाली फॉलिकल्सचा एक समूह विकसित होऊ लागतो. त्यापैकी साधारणपणे एक फॉलिकल प्रमुख बनतो आणि त्यातील अंडे परिपक्व होते. हे फॉलिकल फुटून त्यातून अंडे अंडाशयातून बाहेर पडते. या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन किंवा अंडोत्सर्जन म्हणतात. हा नैसर्गिक गर्भधारणेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, ओव्ह्युलेशन नेमके कधी होते हे प्रत्येक वेळी सहज ओळखता येत नाही, विशेषतः मासिक पाळीचे चक्र अनियमित असल्यास. अशा वेळी, अल्ट्रासाऊंडद्वारे फॉलिकलची वाढ आणि ओव्हुलेशनचे निरीक्षण करून फॉलिक्युलर स्टडी मदत करू शकतो. Follicular study in marathi बद्दल सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय?

फॉलिक्युलर स्टडीला फॉलिक्युलर मॉनिटरिंग असेही म्हणतात. ही अंडाशयातील फॉलिकलची वाढ, अंड्याची परिपक्वता आणि ओव्ह्युलेशनची प्रक्रिया पाहण्यासाठी केली जाणारी अल्ट्रासाऊंड तपासणी आहे. मासिक पाळीच्या चक्रादरम्यान ठराविक अंतराने ट्रान्सव्हॅजायनल किंवा ॲबडॉमिनल अल्ट्रासाऊंड स्कॅनसारखे अनेक अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जाऊ शकतात. यामुळे फॉलिकलची वाढ कशी होत आहे आणि ओव्ह्युलेशन कधी होण्याची शक्यता आहे, हे डॉक्टरांना समजण्यास मदत होते. गर्भधारणेचे नियोजन करताना ओव्ह्युलेशनची योग्य वेळ समजून घेण्यासाठी, IUI साठी योग्य वेळ ठरवण्यासाठी तसेच IVF उपचारांमध्ये फॉलिकलच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी या तपासणीचा उपयोग केला जाऊ शकतो.

फॉलिक्युलर स्टडी का केली जाते?

फॉलिक्युलर स्कॅन ही एक वेदनाहीन प्रक्रिया आहे जी विविध कारणांसाठी केली जाऊ शकते. या तपासणीचा उपयोग पुढील कारणांसाठी केला जाऊ शकतो. 

1. ओव्ह्युलेशनची वेळ जाणून घेण्यासाठी

फॉलिकलचा आकार आणि वाढ अल्ट्रासाऊंडद्वारे पाहून ओव्ह्युलेशन जवळ आले आहे का, याचा अंदाज घेता येतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेचा प्रयत्न करताना योग्य वेळ ठरवण्यास मदत होऊ शकते. तसेच ओव्ह्युलेशनची वेळ लक्षात घेऊन IUI किंवा इतर फर्टिलिटी ट्रीटमेंटचे नियोजन करता येते. 

2. प्रजननक्षम कालावधी ओळखण्यासाठी

गर्भधारणेची शक्यता ओव्ह्युलेशनच्या आसपासच्या दिवसांमध्ये जास्त असते. ओव्ह्युलेशन किट किंवा मासिक पाळीच्या तारखांवरून त्याचा अंदाज घेता येतो; मात्र प्रत्येक महिलेचे चक्र एकसारखे असेलच असे नाही. फॉलिक्युलर स्टडीमध्ये फॉलिकलची प्रत्यक्ष वाढ पाहता येत असल्याने, ओव्ह्युलेशनची संभाव्य वेळ अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होते. 

3. अनियमित ओव्ह्युलेशनची तपासणी करण्यासाठी

मासिक पाळी अनियमित असणे, PCOS किंवा इतर काही कारणांमुळे ओव्ह्युलेशन नियमितपणे होत नसेल, तर फॉलिक्युलर स्टडीचा उपयोग केला जाऊ शकतो. 

4. फर्टिलिटी ट्रीटमेंटचे निरीक्षण करण्यासाठी

ओव्ह्युलेशन वाढवणारी औषधे, IUI किंवा IVF सुरू असताना फॉलिकलची वाढ आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड केले जाते. फॉलिकलची संख्या किंवा वाढ जास्त असल्यास उपचार सुरक्षितपणे पुढे नेण्यासाठी डॉक्टर निर्णय घेऊ शकतात. 

फॉलिक्युलर स्टडी कशी केली जाते?

फॉलिकलची वाढ सुरुवातीपासून ओव्ह्युलेशनपर्यंत पाहण्यासाठी काही दिवसांच्या अंतराने अल्ट्रासाऊंड केले जातात. 

बेसलाइन स्कॅन

फर्टिलिटी ट्रीटमेंटच्या काही चक्रांमध्ये पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी बेसलाइन स्कॅन केला जाऊ शकतो. यात अंडाशय आणि गर्भाशयाची सुरुवातीची स्थिती पाहिली जाते. फॉलिक्युलर स्टडीसाठी प्रामुख्याने ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड केला जातो. जेल लावलेला बारीक प्रोब योनीमार्गातून हळुवारपणे आत सोडून अंडाशय आणि गर्भाशयाच्या प्रतिमा पाहिल्या जातात. यासाठी मूत्राशय रिकामा ठेवण्यास सांगितले जाते. काही वेळा ॲबडॉमिनल अल्ट्रासाऊंड म्हणजेच पोटावरून तपासणी केली जाऊ शकते; त्यासाठी मूत्राशय भरलेले असणे आवश्यक असू शकते.

मॉनिटरिंग फेज

बेसलाइन स्कॅननंतर फॉलिकलची वाढ पाहण्यासाठी दर 1 ते 3 दिवसांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड केला जाऊ शकतो. या स्कॅनमध्ये मासिक पाळीचे चक्र पुढे जात असताना फॉलिकलचा आकार आणि त्याची वाढ कशी होत आहे, हे पाहिले जाते. त्यासोबत गर्भाशयाच्या आतील अस्तराची म्हणजेच एंडोमेट्रियमची जाडी आणि त्यातील बदलही तपासले जाऊ शकतात. फॉलिकलची वाढ आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद यानुसार पुढील स्कॅन कधी करायचा, हे डॉक्टर ठरवतात.

फॉलिक्युलर स्टडी कधी सुरू केली जाते आणि किती दिवस चालते?

फॉलिक्युलर स्टडीची वेळ फॉलिकलच्या वाढीनुसार ठरवली जाते. पाळीचा 1ला दिवस म्हणजे रक्तस्राव सुरू झालेला पहिला दिवस मानला जातो आणि फॉलिक्युलर स्टडीची सुरुवात साधारण पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी केली जाऊ शकते. त्यानंतर फॉलिकलची वाढ पाहण्यासाठी साधारण 8व्या ते 11व्या दिवसापासून अल्ट्रासाऊंड केले जातात.

फॉलिकलच्या वाढीनुसार पुढील स्कॅन 1 ते 3 दिवसांच्या अंतराने केले जाऊ शकतात. ओव्ह्युलेशन झाल्याची चिन्हे दिसेपर्यंत ही तपासणी सुरू ठेवली जाते. एका चक्रात साधारण 3 ते 6 स्कॅन लागतात; मात्र फॉलिकलची वाढ आणि उपचारांनुसार ही संख्या बदलू शकते.

फॉलिक्युलर स्टडीचा रिपोर्ट कसा समजून घ्यावा?

रिपोर्टमध्ये फॉलिकलची वाढ, आकार, परिपक्वता आणि ओव्ह्युलेशनची चिन्हे पाहिली जातात. 

  • फॉलिकल कोणत्या अंडाशयात आहे: ज्या बाजूला (उजव्या किंवा डाव्या अंडाशयात) डोमिनंट फॉलिकल विकसित होत असते, त्यावरून त्या चक्रादरम्यान कोणत्या अंडाशयातून बीजांड बाहेर पडण्याची शक्यता आहे, हे समजते.
  • फॉलिकलचा आकार आणि वाढ: फॉलिकल प्रत्येक स्कॅनमध्ये वाढत आहे का आणि योग्य प्रकारे परिपक्व होत आहे का, हे पाहिले जाते. 
  • फॉलिकलचा आकार वाढत राहणे: फॉलिकल 25 mm पेक्षा मोठा होऊनही फुटत नसेल, तर त्या फॉलिकलमधून अंडे बाहेर न पडण्याची शक्यता तपासली जाते. 
  • एंडोमेट्रियमची जाडी: गर्भाशयाच्या आतील अस्तराची जाडी आणि त्यातील बदलही नोंदवले जातात.
  • ओव्ह्युलेशनची चिन्हे: फॉलिकल लहान किंवा आकसलेला दिसणे आणि अंडाशयाजवळ द्रव दिसणे यांसारख्या बदलांवरून फॉलिकल फुटल्याचे आणि ओव्ह्युलेशन झाल्याचे संकेत मिळू शकतात.

सामान्य फॉलिक्युलर स्टडी रिपोर्ट कसा असतो?

सामान्य फॉलिक्युलर स्टडीमध्ये फॉलिकलची वाढ हळूहळू होत जाऊन ओव्ह्युलेशनपर्यंत पोहोचते. साधारणपणे रिपोर्टमध्ये:

  • सुरुवातीला दोन्ही अंडाशयांमध्ये लहान फॉलिकल्स दिसतात.
  • त्यापैकी साधारण एक प्रमुख फॉलिकल पुढे वाढू लागतो.
  • फॉलिकल हळूहळू वाढून साधारण 18-24 mm आकाराचा होऊ शकतो आणि परिपक्व होतो.
  • त्यानंतर फॉलिकल फुटल्याचे म्हणजेच ओव्ह्युलेशन झाल्याचे संकेत दिसतात.
  • या काळात गर्भाशयाच्या आतील अस्तराची म्हणजेच एंडोमेट्रियमची जाडीही वाढलेली दिसू शकते.

फॉलिक्युलर स्टडीमध्ये फॉलिकलची वाढ न होण्याची कारणे

चाचण्यांनंतर जेव्हा तुमच्या लक्षात येते की फॉलिकल्स अपेक्षेप्रमाणे वाढत नाहीत, तेव्हा या प्रमुख समस्या असू शकतात-

1. हार्मोनल असंतुलन 

FSH, LH आणि इस्ट्रोजेन हे फॉलिकलची वाढ आणि परिपक्वता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या हार्मोन्समध्ये असंतुलन असल्यास फॉलिकलची योग्य वाढ किंवा परिपक्वता होण्यास अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे ओव्ह्युलेशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड हार्मोन्स आणि प्रोलॅक्टिनमधील बदलांचाही ओव्ह्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. 

2. पीसीओएस 

पीसीओएसमध्ये हार्मोन्समधील बदलांमुळे ओव्ह्युलेशन नियमितपणे होत नाही आणि मासिक पाळी अनियमित होऊ शकते. या महिलांमध्ये नियमित ओव्हुलेशनचा अभाव असल्यामुळे, PCOS हे ओव्हुलेशन न होणाऱ्या वंध्यत्वाचे प्रमुख कारण मानले जाते.

3. ओव्ह्युलेशनशी संबंधित इतर समस्या

काही वेळा मेंदूकडून ओव्ह्युलेशनसाठी आवश्यक हार्मोनल संकेत योग्य प्रकारे न मिळणे, ताण, वजनात मोठे बदल किंवा अतिव्यायाम यामुळे फॉलिकलची वाढ आणि परिपक्वता प्रभावित होऊ शकते. थायरॉईडच्या समस्या आणि प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सीमुळेही फॉलिकलची वाढ आणि ओव्ह्युलेशनवर परिणाम होऊ शकतो.

फॉलिक्युलर स्टडीनंतर काय केले जाते?

फॉलिक्युलर स्टडीचा रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांना फॉलिकलची वाढ आणि ओव्ह्युलेशनबद्दल चांगली कल्पना येते. त्यानुसार यशस्वी गर्भधारणेसाठी पुढे काय करायचे, हे ठरवले जाते.

1. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेचे नियोजन

अनेकदा ओव्ह्युलेशनची नेमकी वेळ लक्षात न आल्यामुळे फर्टाइल विंडो चुकू शकतो किंवा मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यामुळे त्याचा अंदाज घेणे कठीण होऊ शकते. फॉलिक्युलर स्टडीमुळे ओव्ह्युलेशनची संभाव्य वेळ अधिक स्पष्टपणे समजते आणि त्या दिवसांच्या आसपास नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेचा प्रयत्न करता येतो.

2. IUI साठी योग्य वेळ

IUI उपचार घेत असताना फॉलिक्युलर स्टडीच्या मदतीने फॉलिकल कधी परिपक्व झाले आहे आणि ओव्ह्युलेशन कधी होण्याची शक्यता आहे, हे समजते. त्यानुसार गर्भाशयात तयार केलेले शुक्राणू सोडण्याची प्रक्रिया योग्य वेळेच्या आसपास केली जाते. IUI उपचाराच्या नियोजनात याचा महत्त्वाचा उपयोग होतो. 

3. ओव्ह्युलेशन इंडक्शन किंवा इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट

फॉलिकल योग्य वेळी परिपक्व होत नसेल किंवा ओव्ह्युलेशनमध्ये अडचण येत असेल, तर डॉक्टर औषधांच्या मदतीने फॉलिकलची वाढ आणि ओव्ह्युलेशन नियंत्रित करू शकतात. काही वेळा ट्रिगर शॉट दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने hCG हार्मोनाचा वापर केला जातो, जो नैसर्गिक ओव्ह्युलेशनच्या आधी होणाऱ्या LH हार्मोनच्या वाढीसारखे काम करून ओव्ह्युलेशनला चालना देतो. याचा उपयोग नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेचे नियोजन, IUI किंवा IVF मध्ये अंडे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेचे योग्य वेळापत्रक ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो.

फॉलिक्युलर स्टडीदरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

फॉलिक्युलर स्टडीसाठी विशेष तयारीची गरज नसते. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

  • मूत्राशय रिकामे ठेवणे: ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंडसाठी मूत्राशय रिकामा असणे आवश्यक असते. पोटावरून अल्ट्रासाऊंड करायचा असल्यास मूत्राशय भरलेला ठेवण्यास सांगितले जाऊ शकते.
  • उपाशी राहण्याची गरज नसते: साधारणपणे नेहमीप्रमाणे खाणे-पिणे करता येते. मात्र, डॉक्टरांनी वेगळी सूचना दिल्यास ती पाळावी.
  • सैल आणि आरामदायी कपडे घालावेत: तपासणीसाठी कपडे बदलणे सोपे जाईल असे कपडे वापरावेत.
  • तपासणीच्या वेळा पाळाव्यात: फॉलिकलची वाढ पाहण्यासाठी अनेक स्कॅन केले जात असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या तारखांना आणि वेळेला तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
  • औषधांची वेळ पाळावी: ओव्ह्युलेशनसाठी औषधे किंवा ट्रिगर शॉट दिला असल्यास त्याची मात्रा आणि वेळ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच पाळावी.

फॉलिक्युलर स्टडीसाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

मासिक पाळी किंवा गर्भधारणेशी संबंधित अडचणी जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा परिस्थितींमध्ये फॉलिक्युलर स्टडीची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवू शकतात.

  • नियमितपणे गर्भनिरोधक न वापरता संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नसेल.
  • मासिक पाळी अनियमित होत असेल किंवा काही काळ पाळी येत नसेल.
  • दोन पाळींमधील अंतर नेहमीपेक्षा खूप जास्त किंवा कमी होत असेल.
  • हार्मोन्सशी संबंधित समस्या, PCOS किंवा थायरॉईडची लक्षणे दिसत असतील.
  • गर्भधारणेसाठी औषधे, IUI किंवा इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू केली असेल. अशावेळी फॉलिकलची वाढ आणि ओव्ह्युलेशन पाहण्यासाठी डॉक्टर फॉलिक्युलर स्टडी सुचवू शकतात.

सारांश

गर्भधारणेच्या प्रवासात अनेक तपासण्या आणि उपचारांच्या वेगवेगळ्या पायऱ्या येऊ शकतात. फॉलिक्युलर स्टडी ही मासिक पाळीच्या सुरुवातीपासून ओव्ह्युलेशन होईपर्यंत फॉलिकलची वाढ पाहण्यासाठी केली जाणारी अल्ट्रासाऊंड तपासण्यांची प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, डॉक्टरांनी फॉलिक्युलर स्टडी सुचवली म्हणजे तुम्हाला गर्भधारणेची समस्या आहे किंवा पुढे महागडे उपचार घ्यावेच लागतील, असे नाही. काही वेळा फॉलिक्युलर स्टडीचा उद्देश फक्त ओव्ह्युलेशनची योग्य वेळ समजून घेणे आणि नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळ साधणे एवढाच असू शकतो. वारंवार स्कॅन करावे लागत असल्यामुळे ही तपासणी थोडी कंटाळवाणी किंवा वेळखाऊ वाटू शकते. पण ओव्ह्युलेशनची वेळ नेमकी समजून घेण्यासाठी आणि गर्भधारणेचे योग्य नियोजन करण्यासाठी ती खूप उपयोगी ठरू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

फॉलिक्युलर स्टडीचा रिपोर्ट त्याच दिवशी मिळतो का?

फॉलिक्युलर स्टडीमध्ये किती अल्ट्रासाऊंड केले जातात?

फॉलिक्युलर स्टडीमुळे ओव्ह्युलेशनची योग्य वेळ कळू शकते का?

फॉलिक्युलर स्टडीमध्ये फॉलिकलचा सामान्य आकार किती असावा?

फॉलिक्युलर स्टडी वेदनादायक असते का?

फॉलिक्युलर स्टडीदरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढते का?

पीसीओएसमध्ये फॉलिक्युलर स्टडी केली जाते का?

फॉलिक्युलर स्टडी आणि सामान्य अल्ट्रासाऊंडमध्ये काय फरक आहे?

Disclaimer: The information provided here serves as a general guide and does not constitute medical advice. We strongly advise consulting a certified fertility expert for professional assessment and personalized treatment recommendations.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer