अंडाशयातील सिस्ट: कारणे, जोखीम आणि डॉक्टरांकडे कधी जावे

Last updated: January 28, 2026

Overview

अंडाशयातील सिस्ट म्हणजे स्त्रीच्या अंडाशयावर किंवा अंडाशयाच्या आत तयार होणाऱ्या पाण्याने भरलेल्या छोट्या पिशव्या. या सिस्ट ओव्ह्युलेशन (अंडोत्सर्जन) झाल्यानंतर फॉलिकलपासून तयार होतात. अशा सिस्टना फंक्शनल सिस्ट म्हटले जाते, कारण त्या अंडाशयाच्या नैसर्गिक कार्याशी संबंधित असतात. साधारणपणे या सिस्ट काही काळाने आपोआप कमी होतात किंवा निघून जातात आणि त्रास देत नाहीत. पण कधी कधी या सिस्ट मोठ्या होऊ शकतात आणि आसपासच्या भागात दुखणे, किंवा पाळी अनियमित होणे अशा समस्या निर्माण करू शकतात. या लेखामध्ये आपण अशा सिस्टची सामान्य कारणे समजून घेणार आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या वयोगटातील महिलांना त्यांच्या शरीराचे निरीक्षण, प्रिवेंशन आणि गरज पडल्यास वेळेत ट्रीटमेंट घेणे सोपे जाईल

अंडाशयातील सिस्टची कारणे: सर्वात सामान्य कारणे

ओव्हेरियन सिस्ट किंवा अंडाशयातील सिस्ट हा महिलांमध्ये खूप सामान्य प्रकार आहे. बहुतेक वेळा या सिस्ट हानिकारक नसतात, पण कधी कधी त्या मोठ्या होऊन आसपासच्या अवयवांवर दाब देऊ शकतात किंवा महिलांच्या फर्टिलिटीमध्ये अडथळाही आणू शकतात. सिस्ट का तयार होते हे जाणून घेतल्याने ती समस्या लाँग-टर्म आहे की शॉर्ट-टर्म हे समजायला मदत होते. चला, आता या सिस्ट तयार होण्याची प्रमुख कारणे पाहूया:

1. फंक्शनल सिस्ट

या प्रकारच्या सिस्ट सर्वात जास्त आढळतात. त्या पुढील दोन प्रकारच्या असतात:

  • फॉलिक्युलर सिस्ट: जेव्हा ओव्ह्युलेशनच्या वेळी अंडे सोडणारा फॉलिकल उघडत नाही, तेव्हा त्यात द्रव जमा होऊ लागतो आणि अशा प्रकारे ही फॉलिक्युलर सिस्ट तयार होते.
  • कॉर्पस ल्यूटियम सिस्ट: कधी कधी फॉलिकल अंडे बाहेर टाकतो, पण नंतर पुन्हा बंद होतो आणि त्यात ब्लड किंवा द्रव जमा होऊ लागतो. अशावेळी कॉर्पस ल्युटियम सिस्ट तयार होते.

2. हॉर्मोनल असंतुलन

इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन या हॉर्मोन्सचे प्रमाण बिघडले की ओव्ह्युलेशनचा (अंडोत्सर्जनाचा) नैसर्गिक चक्र बिघडतो आणि सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते. हॉर्मोनल असंतुलन जीवनशैलीतील बदल, अयोग्य आहार, जास्त ताण किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे होऊ शकते.

3. गर्भधारणा संबंधित सिस्ट:

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात कॉर्पस ल्युटियम कधी कधी एक छोटा सिस्ट तयार करतो. हा सिस्ट वाढत्या बाळाला पोषण मिळण्यासाठी मदत करतो आणि प्लेसेंटा तयार होईपर्यंत प्रोजेस्टेरॉन हा महत्त्वाचा हार्मोन तयार करतो.

4. एंडोमेट्रिओसिस

जेव्हा गर्भाशयाच्या आतील थराचे टिश्यू अंडाशयावर वाढू लागतात, तेव्हा अंडाशयावर वेदनादायक सिस्ट तयार होतात, ज्यांना एंडोमेट्रिओमाज म्हणतात. या सिस्टमध्ये ब्राऊन रंगाचं जुनं रक्त साचलेलं असतं, आणि म्हणूनच त्यांना चॉकलेट सिस्ट असेही म्हणतात. या सिस्ट फंक्शनल सिस्टसारख्या नसतात आणि साधारणपणे स्वतःहून कमी होत नाहीत.

5. पेल्विक इन्फेक्शन्स

कधी कधी पेल्विक भागातील संसर्ग वेळेवर उपचार न केल्यास, पसने भरलेल्या पिशव्यासारखी सिस्ट तयार होऊ शकते आणि हा संसर्ग अंडाशयापर्यंत पसरू शकतो.

वयाशी संबंधित अंडाशयातील सिस्टची कारणे

अंडाशयातील सिस्ट का तयार होतात यामध्ये वयाचाही मोठा वाटा असतो. एखाद्या स्त्रीचे वय पाहून अनेकदा ही सिस्ट नैसर्गिक मासिक पाळीच्या चक्राचा भाग आहे की डॉक्टरांच्या तपासणीची गरज आहे, हे ठरवता येते. उदाहरणार्थ:

1. किशोरवयीन मुली व तरुण महिलांमध्ये

  • ओव्ह्युलेशन सुरू होण्याच्या सुरुवातीच्या काळात फंक्शनल सिस्ट खूप सामान्य असतात, कारण शरीर नव्या हार्मोनल बदलांना स्वीकारत असतं.
  • सुरुवातीच्या काही पाळ्यांमध्ये हार्मोन्समध्ये बरीच चढउतार होत असल्यामुळे ओव्ह्युलेशन नेहमी नियमित होत नाही आणि तात्पुरत्या सिस्ट तयार होऊ शकतात.
  • या वयात मेंदू, पिट्युटरी ग्रंथी आणि अंडाशय यांच्यातील समन्वय (हायपोथॅलॅमिक-पिट्यूटरी-ओव्हेरियन अ‍ॅक्सिस) पूर्णपणे परिपक्व नसतो. यामुळे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
  • या वयातील लाइफस्टाइल, चुकीचे आहार पद्धती आणि ताणतणाव यामुळेही हार्मोनल बिघाड होऊन सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.
  • महत्त्वाचे म्हणजे या वयात तयार होणाऱ्या बहुतेक सिस्ट तात्पुरत्या असतात आणि साधारणपणे ट्रीटमेंटची गरज नसते.

2. प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांमध्ये

  • या वयात एंडोमेट्रिओसिसमुळे तयार होणाऱ्या सिस्ट खूप कॉमन आहेत. या सिस्ट खूप वेदनादायक असतात आणि मेडिकल ट्रीटमेंट आवश्यक असते.
  • ज्या स्त्रिया IVF किंवा इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घेत आहेत, त्यांना अंडाशय उत्तेजित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शक्तिशाली औषधांमुळे सिस्ट तयार होऊ शकतात.
  • ज्या महिलांच्या पाळी अनियमित असते, त्यांच्यात या वयात पुन्हा पुन्हा फंक्शनल सिस्ट होऊ शकतात.

3. रजोनिवृत्तीपूर्व (पेरिमेनोपॉज) काळात

  • जेव्हा स्त्री रजोनिवृत्तीच्या जवळ येते, तेव्हा पाळी अनियमित होणे आणि हार्मोन्समध्ये मोठे बदल होणे हे सर्वसाधारण असते. या बदलांमुळे अंडाशयामध्ये सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.
  • तरुण वयातील हार्मोनल इम्बॅलन्सपेक्षा या वयातील सिस्टसाठी जास्त काळजी आणि मॉनिटरिंग आवश्यक असते, कारण काही सिस्ट नॉन-बेनाइन (कर्करोगजन्य) होण्याची शक्यता जास्त असते.

सिस्ट तयार होण्याशी संबंधित मेडिकल कंडिशन्स

अंडाशयातील सिस्ट नेहमीच आपोआप तयार होत नाहीत; कधी- कधी त्या काही गंभीर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकतात. अशा सिस्ट शरीरासाठी आणि फर्टिलिटीसाठी इतर सिस्टपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतात. चला अशा काही प्रमुख वैद्यकीय कारणांकडे पाहूया:

  • एंडोमेट्रिओसिस: सिस्ट तयार होण्याशी संबंधित सर्वात सामान्य आणि वेदनादायक कारण म्हणजे एंडोमेट्रिओसिस. या स्थितीत गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे टिश्यू अंडाशयावर वाढते. हा टिश्यू पाळीच्या वेळी रक्तस्त्राव करत राहतो, पण बाहेर पडू शकत नाही, आणि त्यामुळे ब्लड भरलेले वेदनादायक सिस्ट तयार होतात.
  • पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस): PCOS मध्ये ओव्ह्युलेशन नीट होत नाही. अंडे पूर्णपणे मॅच्युअर न होणे किंवा अंडाशयातून बाहेर न पडणे. यामुळे अंडाशयात पाणी भरलेल्या अनेक सिस्टसारख्या पिशव्या तयार होतात.
  • थायरॉईड आणि चयापचय विकार: थायरॉइड ही इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची ग्रंथी आहे. थायरॉईड कमी कार्यरत असणे किंवा त्याच्या संतुलनात बिघाड झाल्यास हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आणि त्यामुळे सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.
  • पेल्विक दाहक रोग (पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज- पीआयडी): पेल्विक भागातील संसर्ग योग्य वेळी आणि पूर्णपणे न बरा झाल्यास अंडाशयाच्या संरचनेवर आणि आकारावर वाईट परिणाम होऊ शकतो. अंडाशय कमकुवत होऊन त्याचे सामान्य कार्य बिघडते आणि कधी- कधी सिस्ट तयार होऊ शकतात.

ओव्हेरियन सिस्टचे रिस्क फॅक्टर्स

पहिली पाळी (मेनार्के) सुरू होण्याच्या काळापासून ते पाळी थांबण्याच्या आधीचा टप्पा (पेरिमेनोपॉज) येईपर्यंत, कोणत्याही वयात अंडाशयात सिस्ट तयार होऊ शकतात. पण काही असे घटक असतात जे सिस्ट होण्याचा धोका आणखी वाढवतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:

  • लवकर पाळी सुरू होणे आणि अनियमित मासिक पाळी: ज्या मुलींना वयाच्या खूप लहानपणीच पाळी येऊ लागते, त्यांच्या अंडाशयात सिस्ट तयार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच ज्या मुलींना पाळी अनियमित येते, त्यांच्यातही अनियमित ओव्ह्युलेशनमुळे सिस्ट तयार होऊ शकतात.
  • लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिकार: कधी- कधी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) मुळे वजन खूप वाढणे, पोटाभोवती चरबी जमा होणे आणि शरीरात इन्सुलिनचा योग्य उपयोग न होणे (इन्सुलिन रेझिस्टन्स) अशी स्थिती निर्माण होऊ शकते. या सर्वांचा परिणाम हॉर्मोन्सच्या संतुलनावर होतो आणि त्यातून अंडाशयात सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.
  • फर्टिलिटी ट्रीटमेंट्स: आयव्हीएफसारख्या फर्टिलिटी (वंध्यत्व) उपचारांमध्ये अंडाशयाला उत्तेजना देण्यासाठी खास औषधे दिली जातात. या औषधांच्या मदतीने एकावेळी अनेक फॉलिकल तयार होतात. योग्य डॉक्टरच्या देखरेखीशिवाय ही प्रक्रिया झाल्यास काही फॉलिकल्स सिस्टमध्ये रूपांतरित होण्याचा धोका वाढू शकतो.
  • कौटुंबिक इतिहास: PCOD, एंडोमेट्रिओसिस यासारख्या गायनाकॉलॉजिकल आजार आनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत जाणे खूप कॉमन आहे. त्यामुळे अशा आजारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे जोखीम घटक पूर्णपणे टाळता येत नसले तरी त्यांची जाणीव ठेवणे, नियमित तपासण्या करणे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे यामुळे योग्य वेळी उपचार घेता येतात आणि गुंतागुंती टाळता येऊ शकतात.

ओव्हेरियन सिस्टबद्दल कधी काळजी करावी?

बहुतेक वेळा अंडाशयातील गाठी हानिकारक नसतात आणि त्यासाठी विशेष उपचारांची गरजही भासत नाही. पण खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

इशारा देणारे लक्षण याकडे का लक्ष देणे महत्त्वाचे आहे
तपासणीनंतरही सिस्ट कमी न होता तशीच राहणे किंवा वाढत जाणे फंक्शनल सिस्ट साधारणपणे स्वतःहून गायब होतात. पण सिस्ट कमी न होता उलट वाढत असल्यास, त्यामागे काही आंतरिक मेडिकल कंडिशन असू शकते.
अचानक तीव्र वेदना, ताप, उलट्या, डोके हलके वाटणे सिस्ट फुटणे किंवा अंडाशय वळणे (ओव्हेरियन टॉर्शन) यांसारख्या स्थितींमध्ये अचानक पोटात तीव्र दुखू शकते, ताप, उलट्या किंवा चक्कर येऊ शकते. अशा वेळी अंडाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा थांबू शकतो. ही मेडिकल इमर्जन्सी आहे. तात्काळ डॉक्टरांकडे जा.
अनियमित आणि जास्त प्रमाणात रक्तस्त्राव अनियमित पाळी होणे किंवा नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे हे हार्मोन्स बिघडणे किंवा इतर अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वेळेत उपचार करणे गरजेचे असते.
दैनंदिन कामांवर परिणाम होणे जर सिस्टचा त्रास तुमच्या दैनिक जीवनावर परिणाम करत असेल, तर ते साधा फंक्शनल सिस्ट नसून त्याची तपासणी गरजेची आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

निष्कर्ष

एकंदरीत पाहिले तर अंडाशयातील सिस्ट अनेक वेगवेगळ्या कारणांनी तयार होऊ शकते- साध्या नैसर्गिक नॉर्मल ओव्ह्युलेशनपासून ते काही गंभीर आजारांपर्यंत. तरुण वयात फंक्शनल सिस्ट सामान्य असते आणि बहुतांशी कोणताही त्रास न देता आपोआप नाहीशी होते. पण ती वेदना, अनियमित पाळी किंवा इतर त्रास देत असेल तर तपासणी आवश्यक आहे.

प्रौढ आणि वयस्क महिलांसाठी विशेषतः महत्त्वाचे म्हणजे आपल्या सिस्टचे कारण काय आहे, कोणती लक्षणे दिसत आहेत आणि ती किती गंभीर आहेत, हे समजून घेणे. यामुळे पुढे अधिक गुंतागुंत होण्याची शक्यता कमी करता येते. शेवटी उद्देश असा आहे की सिस्ट कधी गंभीरपणे घ्यायची आणि कधी शरीराला स्वतः आपले काम करू द्यायचे, हे योग्य वेळी ओळखणे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अंडाशयातील सिस्ट होण्याची सामान्य कारणे कोणती?

 

ओव्ह्युलेशनच्या वेळी होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ओव्हेरियन सिस्ट सामान्यपणे तयार होतात. तसेच PCOS किंवा एंडोमेट्रिओसिसमुळेही अशा सिस्ट विकसित होऊ शकतात.

तरुण मुलींमध्ये अंडाशयातील सिस्ट का तयार होते?

 

किशोरवयात पाळी पूर्णपणे नियमित नसते, ओव्ह्युलेशन नीट न होणे, हॉर्मोनल असंतुलन आणि कधी- कधी पीसीओएसमुळे तरुण मुलींमध्ये फंक्शनल सिस्ट तयार होऊ शकतात.

ताण किंवा जीवनशैलीमुळे अंडाशयातील सिस्ट होऊ शकते का?

 

ताण आणि चुकीच्या लाइफस्टाइल सवयी थेट सिस्ट तयार करत नाहीत, पण त्या हार्मोनल बॅलन्सवर परिणाम करू शकतात. हा हार्मोनल इम्बॅलन्स अप्रत्यक्षपणे सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढवू शकतो.

अंडाशयातील सिस्ट सर्जरि न करता सांभाळता येते का?

 

हो, बहुतेक सिस्ट नैसर्गिकरीत्या कमी होतात. या सिस्टसाठी फक्त अल्ट्रासाऊंडने मॉनिटरिंग करण्याची गरज असते.

अंडाशयातील सिस्टमुळे पायात वेदना होऊ शकते का?

 

मोठी सिस्ट पोटाच्या आणि कंबरच्या भागावर दाब देऊ लागली तर कधी -कधी कंबरेत किंवा मांडीपर्यंत वेदना जाणवू शकते. हे जास्त करून मोठ्या किंवा कॉम्प्लेक्स सिस्टमध्ये दिसते.

प्रत्येक अंडाशयातील सिस्टसाठी उपचार करणे गरजेचे असते का?

 

नाही. फंक्शनल सिस्टसारख्या सिस्ट आपोआप कमी होतात आणि कोणतीही गुंतागुंत होत नाही.

झोपेच्या पद्धतीमुळे अंडाशयातील सिस्ट होऊ शकते का?

 

थेट झोपेमुळे सिस्ट होत नाही, पण उशिरापर्यंत जागरण, कमी झोप आणि अनियमित दिनक्रम यामुळे हॉर्मोन्स बिघडू शकतात आणि त्याचा परिणाम अंडाशयावर होऊ शकतो.

अंडाशयातील सिस्ट कधी कर्करोगाचे कारण ठरू शकते?

 

मेनोपॉजनंतर अनियमित, सॉलिड किंवा सतत राहणाऱ्या सिस्ट चिंताजनक असतात. अशावेळी डॉक्टरांकडे सविस्तर तपासणी आणि चाचण्या करणे महत्त्वाचे.

**Disclaimer: The information provided here serves as a general guide and does not constitute medical advice. We strongly advise consulting a certified fertility expert for professional assessment and personalized treatment recommendations.
© 2026 Indira IVF Hospital Private Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer