थायरॉईडची लक्षणे (Thyroid symptoms in Marathi): कोणत्या संकेतांकडे लक्ष द्यावे?

Last updated: September 15, 2026

Overview

थकवा, वजनात अचानक बदल, केस गळणे, त्वचा कोरडी होणे किंवा सतत थंडी वाजणे यांसारखी लक्षणे आपण अनेकदा सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, अशी लक्षणे थायरॉईडच्या कार्यात बदल झाल्याचे संकेतही असू शकतात. थायरॉईड ही मानेच्या पुढील बाजूस असलेली फुलपाखराच्या आकाराची लहान एंडोक्राइन ग्रंथी आहे. ती T3 आणि T4 हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स शरीरातील चयापचय, ऊर्जा, वजन, शरीराचे तापमान तसेच त्वचा, केस आणि नखांच्या वाढीसारख्या अनेक प्रक्रियांवर परिणाम करतात. म्हणून थायरॉईडचे हार्मोन्स कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसू शकतो आणि लक्षणेही व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. भारतात सुमारे 4.2 कोटी लोकांना थायरॉईडशी संबंधित आजार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे थायरॉईडबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

थायरॉईडची लक्षणे (Thyroid symptoms in Marathi)

थायरॉईडच्या समस्यांमध्ये मुख्यतः थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होणे किंवा थायरॉईड ग्रंथीच्या आकारात बदल होणे यांचा समावेश होतो. लक्षणे कोणती दिसतील आणि त्यांची तीव्रता किती असेल, हे समस्येच्या प्रकारावर आणि हार्मोन्सच्या पातळीवर अवलंबून असते. 

1. हायपोथायरॉईडिझम

हायपोथायरॉईडिझममध्ये थायरॉईड ग्रंथी शरीराला आवश्यक तेवढे T3 आणि T4 हार्मोन्स तयार करत नाही. त्यामुळे शरीरातील चयापचयाची गती मंदावते. यामुळे प्रयत्न न करताही वजन वाढू शकते आणि सतत थकवा जाणवू शकतो. TSH वाढलेले आणि T4 कमी असणे हे प्राथमिक हायपोथायरॉईडिझमचे सामान्य स्वरूप आहे. हार्मोन्सची कमतरता अधिक असेल किंवा जास्त काळ राहिली असेल, तर लक्षणे अधिक स्पष्ट होऊ शकतात. मुख्य लक्षणे:

  • सतत थकवा किंवा अशक्तपणा
  • वजन वाढणे
  • थंडी जास्त जाणवणे
  • बद्धकोष्ठता
  • त्वचा कोरडी होणे
  • केस गळणे किंवा केस कोरडे होणे
  • चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज येणे
  • हृदयाचे ठोके मंद होणे
  • मासिक पाळीत बदल
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा विसरभोळेपणा

2. हायपरथायरॉईडिझम

हायपरथायरॉईडिझममध्ये थायरॉईड ग्रंथी T3 आणि T4 हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त तयार करते. त्यामुळे शरीरातील चयापचयाची गती वाढते. T3 आणि T4 वाढलेले आणि TSH कमी असणे हे प्राथमिक हायपरथायरॉईडिझममध्ये सामान्यतः दिसते. हार्मोन्सची पातळी जास्त असेल तर लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. मुख्य लक्षणे:

  • वजन कमी होणे
  • हृदयाची धडधड वाढणे
  • जास्त घाम येणे
  • उष्णता सहन न होणे
  • हातांना कंप येणे
  • अस्वस्थपणा किंवा चिडचिड
  • झोपेचा त्रास
  • वारंवार शौचास होणे
  • स्नायूंमध्ये अशक्तपणा
  • मासिक पाळीत बदल

3. गलगंड

गलगंड म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढणे. कधी संपूर्ण थायरॉईड ग्रंथी मोठी होते, तर कधी त्यामध्ये एक किंवा अधिक छोट्या गाठी म्हणजे थायरॉईड नोड्युल्स तयार होतात. यामागे अनेक कारणे असू शकतात; त्यापैकी आयोडीनची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे. गलगंड असताना थायरॉईड हार्मोन्स कमी, जास्त किंवा सामान्य असू शकतात. मुख्य लक्षणे:

  • मानेच्या पुढील भागात सूज किंवा फुगवटा
  • घशात दाब किंवा अडथळा जाणवणे 
  • गिळताना त्रास
  • आवाजात बदल
  • मोठा गलगंड असल्यास श्वास घेण्यास त्रास

4. थायरॉईड कर्करोग

थायरॉईड कर्करोगामध्ये थायरॉईडच्या पेशींची अनियंत्रित वाढ होऊन थायरॉईडमध्ये गाठ तयार होऊ शकते. सुरुवातीला अनेकदा कोणतीही लक्षणे नसतात आणि थायरॉईड हार्मोन्सची पातळीही सामान्य असू शकते. लक्ष देण्यासारखी लक्षणे:

  • मानेत नवीन गाठ किंवा सूज
  • गाठ वाढत जाणे
  • गिळताना किंवा श्वास घेताना त्रास
  • आवाज बसणे किंवा आवाजात बदल
  • मानेत किंवा घशात सतत वेदना
  • मानेतील लिम्फ नोड्स वाढणे

थायरॉईडची कारणे

थायरॉईडची समस्या होण्यामागे एकच कारण नसते. थायरॉईड हार्मोन्स कमी किंवा जास्त होणे, थायरॉईड ग्रंथीला झालेली इजा किंवा सूज, काही औषधे आणि शरीरातील इतर हार्मोनल समस्या यामुळे थायरॉईडचे कार्य बिघडू शकते. कारणे समस्येच्या प्रकारानुसार वेगवेगळी असतात. 

हायपोथायरॉईडिझममध्ये थायरॉईड पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही. त्याची प्रमुख कारणे: 

  1. हाशिमोटो रोग: हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक सिस्टम थायरॉईडवरच हल्ला करते.
  2. जन्मजात थायरॉईड समस्या: काही बाळांचा थायरॉईड पूर्णपणे विकसित झालेला नसतो किंवा तो योग्य प्रकारे काम करत नाही. काही आनुवंशिक कारणांमुळेही थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती बिघडू शकते.
  3. आयोडीनची कमतरता: थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी आयोडीन आवश्यक असते. शरीरात आयोडीन कमी असल्यास थायरॉईडचे कार्य कमी होऊ शकते आणि गलगंडही होऊ शकतो.
  4. थायरॉईडायटिस: थायरॉईडला आलेली सूज काही वेळा आधी हार्मोन्स वाढवू शकते आणि नंतर त्यांची पातळी कमी करू शकते. प्रसूतीनंतर होणाऱ्या पोस्टपार्टम थायरॉईडायटिसमध्ये असे होऊ शकते. 
  5. काही औषधे: लिथियम, अमायोडॅरोन आणि काही इतर औषधांमुळे थायरॉईडचे काम कमी-जास्त होऊ शकते. 
  6. थायरॉईडवरील उपचार: थायरॉईड ग्रंथीचा काही भाग किंवा संपूर्ण ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया किंवा काही प्रकारचे रेडिएशनमुळे हार्मोन्स कमी होऊ शकतात.
  7. पिट्यूटरी ग्रंथीची समस्या: क्वचित पिट्यूटरी ग्रंथी पुरेसे TSH तयार करत नाही. त्यामुळे थायरॉईडला हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक संकेत मिळत नाहीत. याला सेकंडरी हायपोथायरॉईडिझम म्हणतात.
  • हायपरथायरॉईडिझम

हायपरथायरॉईडिझममध्ये थायरॉईड गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते. त्याची प्रमुख कारणे:

  1. ग्रेव्ह्ज रोग: हा स्वयंप्रतिकार विकार असून हायपरथायरॉईडिझमचे सर्वात सामान्य कारण आहे.
  2. थायरॉईड नोड्युल्स: काही गाठी स्वतःहून जास्त थायरॉईड हार्मोन्स तयार करू शकतात.
  3. थायरॉईडायटिस: थायरॉईडला आलेल्या सूजेमुळे साठवलेले हार्मोन्स रक्तात जास्त प्रमाणात सोडले जाऊ शकतात.
  4. आयोडीनचे प्रमाण जास्त होणे: जास्त आयोडीन किंवा आयोडीन असलेल्या काही औषधांमुळे काही व्यक्तींमध्ये थायरॉईड हार्मोन्स वाढू शकतात.
  5. काही औषधे: विशेषतः अमायोडॅरोनसारखी आयोडीनयुक्त औषधे काही वेळा हायपरथायरॉईडिझमला कारणीभूत ठरू शकतात

थायरॉईडचे निदान

थायरॉईडची समस्या आहे की नाही आणि ती नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर लक्षणे, शारीरिक तपासणी आणि काही रक्ताच्या चाचण्यांच्या मदतीने निदान करतात. 

  • थायरॉईड प्रोफाइल- डॉक्टर सर्वात पहिले थायरॉईड प्रोफाइल करण्याचा सल्ला देतात. या रक्ताच्या तपासणीत TSH, T3 आणि T4 या हार्मोन्सची पातळी तपासली जाते. 
  • थायरॉईड अँटीबॉडीजची चाचणी- हाशिमोटो रोग किंवा ग्रेव्ह्ज रोगासारखा ऑटोइम्यून आजार कारणीभूत आहे का हे तपासण्यासाठी थायरॉईड अँटीबॉडीजची चाचणी केली जाऊ शकते.
  • इतर तपासण्या- थायरॉईडमध्ये गाठ आढळल्यास डॉक्टर गरजेनुसार FNAC म्हणजे बारीक सुईने गाठीतील पेशींचा नमुना घेण्याची तपासणी सुचवू शकतात. काही परिस्थितींमध्ये थायरॉईड स्कॅन किंवा इतर इमेजिंग चाचण्याही केल्या जाऊ शकतात.

सामान्य TSH पातळी किती असते?

वेगवेगळ्या लॅबनुसार नॉर्मल रेंज थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे रिपोर्टमध्ये दिलेली रेफरन्स रेंज पाहणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः

 

तपासणी

सामान्य पातळी

TSH

0.5 ते 4 mIU/L

T3 (Total T3)

80 ते 180 ng/dL

Free T4

0.8 ते 1.8 ng/dL

 

थायरॉईडवरील उपचार 

थायरॉईडचा उपचार हा थायरॉईड हार्मोन्स कमी आहेत की जास्त, तसेच त्यामागचे कारण काय आहे यावर अवलंबून असतो. 

  • हायपोथायरॉईडिझमवरील उपचार

हायपोथायरॉईडिझममध्ये लेव्होथायरॉक्सिन हे थायरॉईड हार्मोनचे कृत्रिम रूप असलेले औषध दिले जाते. यामुळे हार्मोनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. औषधाची योग्य मात्रा ठरवण्यासाठी वेळोवेळी TSH तपासणी केली जाते. हे औषध अनेक रुग्णांना दीर्घकाळ किंवा आयुष्यभर घ्यावे लागू शकते. 

  • हायपरथायरॉईडिझमवरील उपचार

हायपरथायरॉईडिझममध्ये थायरॉईड हार्मोन्स जास्त तयार होत असल्यामुळे त्यांची पातळी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये थायरॉईडविरोधी औषधे, किरणोत्सर्गी आयोडीन किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. 

  • थायरॉईडविरोधी औषधे

ही औषधे थायरॉईड ग्रंथीमध्ये हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी करतात. मेथिमाझोल आणि प्रोपिलथायोयुरासिल ही यातील प्रमुख औषधे आहेत. कोणते औषध आणि किती काळ घ्यायचे हे कारण आणि रुग्णाच्या स्थितीनुसार डॉक्टर ठरवतात. 

  • किरणोत्सर्गी आयोडीन

किरणोत्सर्गी आयोडीन तोंडावाटे दिले जाते. थायरॉईड ग्रंथी आयोडीन शोषून घेत असल्यामुळे ते थायरॉईडच्या जास्त सक्रिय पेशींवर परिणाम करते आणि हार्मोन्सचे उत्पादन कमी करते. या उपचारानंतर काही रुग्णांमध्ये हायपोथायरॉईडिझम होऊ शकतो, ज्यासाठी नंतर थायरॉईड हार्मोनची औषधे घ्यावी लागू शकतात. 

  • बीटा-ब्लॉकर

हे हार्मोनची पातळी कमी करत नाहीत, पण हृदयाची धडधड, हात थरथरणे आणि अस्वस्थपणा यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करतात.  

  • शस्त्रक्रिया

काही रुग्णांमध्ये थायरॉईडचा काही भाग किंवा संपूर्ण ग्रंथी काढण्याची थायरॉईडेक्टॉमी केली जाते. संपूर्ण ग्रंथी काढल्यास आयुष्यभर थायरॉईड हार्मोनची औषधे घ्यावी लागतात.  

निष्कर्ष

थायरॉईड ही शरीरातील एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. थायरॉईड हार्मोन्स शरीराचा चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे थायरॉईड नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर आणि वेगवेगळ्या प्रक्रियांवर होऊ शकतो. म्हणूनच थकवा, वजनात बदल, केस गळणे, हृदयाची धडधड किंवा मासिक पाळीत बदल यांसारखी कारणे स्पष्ट नसलेली लक्षणे दिसल्यास डॉक्टर अनेकदा थायरॉईड प्रोफाइल करण्याचा सल्ला देतात. आयोडीनची कमतरता टाळण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात आयोडीनयुक्त मीठ वापरणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, यामुळे थायरॉईडची समस्या होणार नाही याची हमी मिळत नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात ठेवतानाच, Thyroid symptoms in Marathi समजून घेणे आणि त्यातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महिलांमध्ये थायरॉईडची लक्षणे कोणती आहेत?

थायरॉईडची समस्या असल्यास शरीराला कसे वाटते?

थायरॉईडची समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते का?

थायरॉईडचा उपचार न करता तो बरा होऊ शकतो का?

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि ती वैद्यकीय सल्ला मानू नये. योग्य तपासणी आणि वैयक्तिक उपचारांसाठी प्रमाणित फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer