रजोनिवृत्ती म्हणजे काय? (Menopause Meaning in Marathi): कारणे, टप्पे, लक्षणे आणि उपचार

Last updated: September 06, 2026

आढावा

रजोनिवृत्ती ही महिलांच्या वय वाढताना शरीरात नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. हा कोणताही आजार किंवा विकार नसून महिलांच्या आयुष्यातील एक सामान्य टप्पा आहे. काही महिलांना या टप्प्याची भीती वाटू शकते, कारण त्यांना तो वाढत्या वयाची आठवण करून देतो. या काळात होणारे शारीरिक आणि भावनिक बदल काही महिलांना चिडचिड, अस्वस्थता किंवा भावनिक बदल जाणवण्यास कारणीभूत ठरू शकतात. काही महिलांमध्ये रजोनिवृत्तीची लक्षणे तीव्र असतात, तर काहींना सौम्य लक्षणे जाणवतात. 

रजोनिवृत्ती म्हणजे काय?

रजोनिवृत्ती म्हणजे महिलेच्या आयुष्यातील असा टप्पा, जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता संपते. मात्र, दोन्ही अंडाशय सर्जरिद्वारे काढल्यामुळेही रजोनिवृत्ती होऊ शकते. याला इंड्यूस्ड मेनोपॉज म्हणतात आणि अशा वेळी रजोनिवृत्तीची लक्षणे अचानक सुरू होऊ शकतात.

रजोनिवृत्ती कोणत्या वयात येते?

रजोनिवृत्तीचे ठराविक वय नसते, मात्र बहुतेक महिलांमध्ये ती 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान होते. प्रत्येक महिलेचे रजोनिवृत्तीचे वय वेगळे असू शकते. यामध्ये अनुवंशिकता, आरोग्यविषयक स्थिती आणि काही जीवनशैलीशी संबंधित घटक भूमिका बजावू शकतात. वयाच्या 40 वर्षांपूर्वी पाळी कायमची बंद झाल्यास, त्यामागे अकाली रजोनिवृत्ती (प्रीमॅच्युअर मेनोपॉज), प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी किंवा इतर कारणे असू शकतात.

रजोनिवृत्ती का होते?

जसजसे वय वाढत जाते, तसतशी अंडाशयांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. अंडाशयांचे एक महत्त्वाचे काम म्हणजे अंडी साठवण्यासोबतच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांसारखे हार्मोन्स तयार करणे. हे हार्मोन्स मासिक पाळीचे चक्र नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वय वाढल्यावर अंडाशय या हार्मोन्सची निर्मिती कमी प्रमाणात करू लागतात. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र बदलते, पाळी अनियमित होऊ शकते आणि हळूहळू ती पूर्णपणे थांबते. वय वाढत असताना अंड्यांचा साठाही कमी होत जातो, ज्यामुळे अंडाशयांची कार्यक्षमता हळूहळू कमी होण्यास हातभार लागतो. सलग 12 महिने पाळी न आल्यावर रजोनिवृत्ती झाल्याचे मानले जाते.

रजोनिवृत्तीचे टप्पे

Menopause meaning in Marathi म्हणजे मासिक पाळी कायमची थांबणे. नैसर्गिक रजोनिवृत्ती अचानक होत नाही, तिच्याआधी आणि नंतर शरीरात हळूहळू बदल होत जातात. या नैसर्गिक प्रक्रियेचे मुख्यतः तीन टप्पे मानले जातात

पेरीमेनोपॉज (Perimenopause) 

पेरीमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या आधीचा काळ. हा टप्पा साधारणपणे चाळीशीनंतर  सुरू होऊ शकतो आणि काही 8-10 वर्षे टिकू शकतो. या काळात अंडाशयांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि इस्ट्रोजेनच्या पातळीत चढ-उतार होऊ लागतात. त्यामुळे पाळी अनियमित होणे, हॉट फ्लॅशेस, मूडमध्ये बदल आणि झोपेच्या समस्या यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. . 

रजोनिवृत्ती (Menopause)

सलग 12 महिने पाळी न आल्यानंतर रजोनिवृत्ती झाल्याचे मानले जाते. या टप्प्यावर, तुमच्या अंडाशयातून अंडोत्सर्ग (ओव्ह्यूलेशन)  आणि तुमचे शरीर पुरेसे इस्ट्रोजेन तयार करत नाही. इतर टप्प्यांच्या तुलनेत, रजोनिवृत्ती हा एक निश्चित क्षण किंवा टप्पा असतो; त्यामुळे तुम्ही या अवस्थेत कायमस्वरूपी राहत नाही.  हा टप्पा पेरीमेनोपॉजसारखा अनेक वर्षे चालत नाही. 

 

रजोनिवृत्तीनंतरचा काळ (Postmenopause)

रजोनिवृत्तीनंतर सुरू होणाऱ्या काळाला पोस्टमेनोपॉज म्हणतात आणि हा आयुष्यभर राहतो. रजोनिवृत्तीची अनेक लक्षणे या काळात कमी होतात, मात्र काही महिलांमध्ये हॉट फ्लॅशेस किंवा इतर लक्षणे काही काळ सुरू राहू शकतात. इस्ट्रोजेनची पातळी कमी राहिल्यामुळे या काळात ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, त्यामुळे हाडे आणि हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 

रजोनिवृत्तीची लक्षणे

रजोनिवृत्तीची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी असू शकतात. काहींना सौम्य लक्षणे जाणवतात, तर काहींना त्यांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. ही लक्षणे बहुतेकदा पेरीमेनोपॉजच्या काळात सुरू होतात आणि काही लक्षणे रजोनिवृत्तीनंतरही काही काळ राहू शकतात. 

मासिक पाळीतील बदल

अनेक महिलांना रजोनिवृत्तीच्या आधी पाळीतील बदल हे पहिले लक्षण जाणवते. पाळी नेहमीपेक्षा लवकर किंवा उशिरा येऊ शकते, दोन पाळींमधील अंतर बदलू शकते आणि रक्तस्राव कमी किंवा जास्त होऊ शकतो. हळूहळू पाळी पूर्णपणे थांबते.

शारीरिक लक्षणे

  • हॉट फ्लॅशेस आणि रात्री घाम येणे: अचानक शरीरात, विशेषतः चेहरा, मान आणि छातीच्या भागात उष्णता जाणवणे, त्यानंतर घाम येणे किंवा थंडी वाजणे. रात्री असे झाल्यास त्याला नाईट स्वेट्स म्हणतात आणि त्यामुळे झोपही बिघडू शकते.
  • झोपेच्या समस्या: झोप येण्यास त्रास होणे, रात्री वारंवार जाग येणे किंवा पहाटे लवकर जाग येणे.
  • योनीमध्ये कोरडेपणा: इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे योनीमध्ये कोरडेपणा, जळजळ किंवा खाज येऊ शकते आणि लैंगिक संबंधांदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
  • लैंगिक इच्छेत बदल: काही महिलांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होऊ शकते.
  • लघवीशी संबंधित समस्या: वारंवार लघवी होणे, अचानक लघवीची तीव्र इच्छा होणे किंवा लघवीवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होणे. या काळात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होण्याचा धोका देखील वाढू शकतो.
  • शरीरातील बदल: कंबरेभोवती चरबी वाढणे, स्नायूंचे प्रमाण कमी होणे, त्वचा कोरडी किंवा पातळ होणे आणि सांधे व स्नायूंमध्ये कडकपणा किंवा वेदना जाणवणे.

मानसिक आणि भावनिक लक्षणे

  • मूडमध्ये बदल किंवा चिडचिड होणे
  • अस्वस्थता किंवा चिंता जाणवणे
  • लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे
  • विसरभोळेपणा किंवा स्मरणशक्तीत बदल जाणवणे

रजोनिवृत्तीचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम मासिक पाळीपुरता मर्यादित राहत नाही, तर हाडे, हृदय, स्नायू आणि इतर आरोग्यावरही होऊ शकतो. 

1. हाडांच्या आरोग्यावर परिणाम

इस्ट्रोजेन हाडांची घनता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे हाडांची झीज वेगाने होऊ शकते आणि हाडांची घनता कमी होऊ शकते. त्यामुळे पुढे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढू शकतो.

2. हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे, वय वाढणे आणि शरीरातील चयापचयातील बदल यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, वजन आणि शारीरिक हालचाल यांसारखे इतर घटकही या जोखमीवर परिणाम करतात. 

3. योनी आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम

इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे योनीच्या ऊतींमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे योनीमध्ये कोरडेपणा, जळजळ किंवा अस्वस्थता, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना आणि लैंगिक इच्छेत बदल जाणवू शकतात. या लक्षणांना एकत्रितपणे जेनिटोयुरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज (GSM) असे म्हटले जाते.

4. मूत्रमार्गाच्या आरोग्यावर परिणाम

रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या बदलांमुळे वारंवार लघवी होणे, लघवीची तीव्र इच्छा, जळजळ किंवा लघवीवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होऊ शकतो. तसेच काही महिलांमध्ये UTI वारंवार होण्याचा धोका वाढू शकतो. 

रजोनिवृत्तीचे निदान कसे केले जाते?

रजोनिवृत्तीचे निदान करण्यासाठी डॉक्टर पाळीतील बदल, वय आणि जाणवणारी लक्षणे याबद्दल माहिती घेतात. साधारणपणे 45 वर्षांनंतर सलग 12 महिने पाळी आली नसेल, तर त्यावरून रजोनिवृत्तीचे निदान केले जाऊ शकते. गरज असल्यास डॉक्टर FSH सारख्या हार्मोन्सची रक्त तपासणी किंवा इतर तपासण्या सुचवू शकतात. विशेषतः वयाच्या 40 वर्षांपूर्वी पाळी बंद झाल्यास अधिक तपासणीची गरज असू शकते. 

रजोनिवृत्तीवर कोणते उपचार उपलब्ध आहेत?

रजोनिवृत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने प्रत्येक महिलेला उपचारांची गरज नसते. मात्र, लक्षणे त्रासदायक असतील तर त्यांना कमी करण्यासाठी काही उपचार उपलब्ध आहेत.

जीवनशैलीतील बदल

  • हॉट फ्लॅशेससाठी: सैल आणि हलके कपडे घाला, कॉटनसारखे श्वास घेऊ देणारे कापड वापरा आणि खोलीचे तापमान थंड ठेवा. मसालेदार पदार्थ, कॅफीन आणि मद्यपानामुळे काही महिलांमध्ये हॉट फ्लॅशेस वाढू शकतात, त्यामुळे ते कमी करून पाहा.
  • संतुलित आहार: पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सात्त्विक आहार घेण्याचाही सल्ला दिला जातो.
  • ध्यान किंवा इतर रिलॅक्सेशन पद्धती वापरणे उपयोगी ठरू शकते. 

औषधोपचार

  • नॉन-हार्मोनल औषधे: ज्या महिलांना हार्मोन थेरपी योग्य नसते किंवा ती घ्यायची नसते, त्यांच्यासाठी काही नॉन-हार्मोनल औषधे हॉट फ्लॅशेस कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. यामध्ये काही अँटिडिप्रेसंट्स, गॅबापेंटिन आणि काही विशिष्ट औषधांचा समावेश होतो.
  • योनीमध्ये कोरडेपणा किंवा अस्वस्थता असल्यास: वॉटर-बेस्ड किंवा सिलिकॉन-बेस्ड ल्युब्रिकंट्स वापरल्याने लैंगिक संबंधांदरम्यान होणारी अस्वस्थता कमी होऊ शकते. नियमित लैंगिक क्रियेमुळे योनीमध्ये रक्तप्रवाह चांगला राहण्यासही मदत होऊ शकते.

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT)

HRT मध्ये रजोनिवृत्तीमुळे शरीरात कमी झालेल्या इस्ट्रोजेन आणि गरजेनुसार प्रोजेस्टोजेन या हार्मोन्सची औषधांद्वारे भरपाई केली जाते. यामुळे हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणे, योनीतील कोरडेपणा आणि लैंगिक संबंधांदरम्यान होणारी वेदना यांसारखी लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, HRT मुळे हाडांची झीज कमी करून ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

रजोनिवृत्तीच्या काळात आहार आणि जीवनशैली कशी असावी?

या काळात खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. 

  • प्लेट जितकी रंगीत, तितके आयुष्यही रंगीत: वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या खा. यामुळे विविध व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
  • प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D: डाळी, दूध-दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नट्स आणि बिया आहारात ठेवा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स घेऊ शकता.
  • संपूर्ण धान्य आणि हेल्दी फॅट्स: ओट्स, ज्वारी, बाजरी, ब्राउन राईस, संपूर्ण गहू, अक्रोड, जवस आणि चिया सीड्स यांचा आहारात समावेश करा.
  • फायटोएस्ट्रोजेन: सोयाबीन, चणे, शेंगदाणे आणि जवस यांसारख्या पदार्थांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात, जे शरीरात इस्ट्रोजेनसारखे काही प्रमाणात कार्य करू शकतात.
  • काय कमी करावे: जास्त साखर, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त मीठ, कॅफीन आणि मद्यपान कमी करा. यामुळे काही महिलांमध्ये हॉट फ्लॅशेस आणि झोपेच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • व्यायाम, झोप आणि ताण: नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि ध्यान किंवा दीर्घ श्वास घेण्यासारख्या पद्धतींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. केगल एक्सरसाइज पेल्विक फ्लोअर मजबूत करण्यास आणि काही लघवीच्या समस्यांमध्ये मदत करू शकतात.

रजोनिवृत्तीबद्दलचे सामान्य गैरसमज

  • गैरसमज: रजोनिवृत्ती 50 वर्षांनंतरच सुरू होते.
    सत्य: रजोनिवृत्तीचे ठराविक वय नसते. काही महिलांना 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान रजोनिवृत्ती येऊ शकते, ज्याला अर्ली मेनोपॉज म्हणतात. काही वेळा शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचारांमुळेही ती लवकर येऊ शकते.
  • गैरसमज: रजोनिवृत्ती म्हणजे फक्त हॉट फ्लॅशेस.
    सत्य: हॉट फ्लॅशेस हे सामान्य लक्षण आहे, पण त्यासोबत चिंता, भावनिक आणि शारीरिक बदल, स्मरणशक्ती किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण, झोपेच्या समस्या आणि लघवीवर नियंत्रण ठेवण्यास त्रास यांसारखी इतर लक्षणेही होऊ शकतात.
  • गैरसमज: रजोनिवृत्ती पार करण्यासाठी प्रत्येकाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतात.
    सत्य: प्रत्येक महिलेला सप्लिमेंट्सची गरज असतेच असे नाही. कोणतेही सप्लिमेंट्स डॉक्टरांनी सुचवल्यासच घ्या, विशेषतः हार्मोनल किंवा मेनोपॉजशी संबंधित सप्लिमेंट्स स्वतःहून सुरू करू नका.
  • गैरसमज: रजोनिवृत्तीचा त्रास सहन करत राहायचा; ही काही नवीन गोष्ट नाही.
    सत्य: हो, रजोनिवृत्ती ही नवीन किंवा असामान्य गोष्ट नाही, पण प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. एखादे लक्षण तुम्हाला त्रास देत असेल किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर डॉक्टरांशी नक्की बोला.
  • गैरसमज: रजोनिवृत्तीनंतर लैंगिक जीवन संपते.

सत्य: लैंगिक जीवन सुरू ठेवता येते; मात्र कोरडेपणा किंवा इतर त्रास असल्यास उपचारांची मदत घेता येते. 

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

रजोनिवृत्तीच्या काळात काही शारीरिक आणि भावनिक बदल सामान्य असू शकतात. मात्र, भावनिक त्रास खूप वाढत असेल, खासगी भागात अस्वस्थता जाणवत असेल, स्नायू किंवा सांध्यांमध्ये जास्त वेदना होत असतील किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे बदल रजोनिवृत्तीशी किंवा वाढत्या वयाशी संबंधित असू शकतात. योग्य कारण समजून घेण्यासाठी वेळेत तपासणी करून घेणे चांगले. 

निष्कर्ष

महिलेच्या आयुष्यात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि रजोनिवृत्ती हा त्यापैकीच एक नैसर्गिक टप्पा आहे. त्यामुळे याची भीती बाळगण्याची गरज नाही, पण या काळात आपल्या आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे नक्कीच महत्त्वाचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींशी याबद्दल बोला, आपले अनुभव शेअर करा; मात्र इतरांशी सतत तुलना करू नका, त्रासाकडे दुर्लक्ष करू नका आणि विनाकारण जास्त चिंता करू नका. प्रत्येक महिलेचा रजोनिवृत्तीचा अनुभव वेगळा असतो. हा देखील तुमच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा आहे, तो स्वीकारा, स्वतःची काळजी घ्या आणि मनापासून जगा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रजोनिवृत्ती आणि पेरीमेनोपॉजमध्ये काय फरक आहे?

रजोनिवृत्ती लवकर येण्याची कारणे कोणती असू शकतात?

रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकते का?

रजोनिवृत्तीची लक्षणे किती वर्षे टिकू शकतात?

रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणे सामान्य आहे का?

रजोनिवृत्तीमुळे वजन वाढते का?

रजोनिवृत्तीनंतर लैंगिक जीवनावर परिणाम होतो का?

रजोनिवृत्ती ही आजार आहे की नैसर्गिक प्रक्रिया?

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि ती वैद्यकीय सल्ला मानू नये. योग्य तपासणी आणि वैयक्तिक उपचारांसाठी प्रमाणित फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer