टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय (Testosterone meaning in Marathi)? पुरुषांच्या आरोग्य आणि प्रजननक्षमतेतील त्याची भूमिका जाणून घ्या

Last updated: September 06, 2026

आढावा

टेस्टोस्टेरॉन हा शरीरातील एक महत्त्वाचा लैंगिक हार्मोन आहे. हा हार्मोन शरीरातील पुरुषी आणि स्त्रीत्वाशी संबंधित काही शारीरिक गुणांच्या विकासात भूमिका बजावतो. किशोरावस्था, लैंगिक इच्छा आणि प्रजननाशी संबंधित अनेक प्रक्रियांमध्येही टेस्टोस्टेरॉन महत्त्वाचे काम करते. 

टेस्टोस्टेरॉन वर एक संक्षिप्त मार्गदर्शक

पुरुषांमध्ये तो अंदाजे प्रामुख्याने वृषणांमध्ये (टेस्टिकल्समध्ये) तयार होतो आणि ॲड्रिनल ग्रंथींद्वारे अल्प प्रमाणात तयार होते. स्त्रियांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची निर्मिती मुख्यतः अंडाशय आणि ॲड्रिनल ग्रंथींमध्ये तयार होते. काही प्रमाणात ते त्वचेच्या पेशी आणि चरबीच्या पेशींमध्ये सुद्धा तयार होते. 

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे काम 

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनमुळे किशोरावस्थेत आवाजात बदल होणे, चेहऱ्यावर आणि शरीरावर केस येणे, स्नायूंची वाढ आणि लैंगिक अवयवांचा विकास होतो. प्रौढ पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा, स्नायू आणि हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासोबतच शुक्राणू तयार होण्यासाठीही टेस्टोस्टेरॉन आवश्यक असते. 

महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे काम 

महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असले तरी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. इस्ट्रोजेन तयार होण्यासाठी टेस्टोस्टेरॉनचाही काही प्रमाणात उपयोग होतो. इस्ट्रोजेन हा एक महत्त्वाचा लैंगिक हार्मोन आहे, जो मासिक पाळी, प्रजननक्षमता, हाडांचे आरोग्य आणि शरीरातील इतर अनेक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. 

टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कशी नियंत्रित होते?

टेस्टोस्टेरॉनची निर्मिती केवळ अंडकोष किंवा अंडाशय स्वतः ठरवत नाहीत. मेंदूतील हायपोथॅलेमस आणि पिट्यूटरी ग्रंथी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शरीराला आवश्यकतेनुसार टेस्टोस्टेरॉन तयार करण्याचे संकेत देतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत काही समस्या आल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी किंवा जास्त होऊ शकते.

टेस्टोस्टेरॉन चाचणी का केली जाते?

टेस्टोस्टेरॉनची पातळी वय, आरोग्य आणि शरीरातील इतर हार्मोन्सनुसार बदलत राहते. टेस्टोस्टेरॉन हे केवळ पुरुषांच्या मर्दानीपणाशी जोडलेले नसून त्यांच्या एकूण शारीरिक आणि लैंगिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच “Testosterone Meaning in Marathi” समजून घेणे आणि हा हार्मोन शरीरात नेमके काय काम करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. टेस्टोस्टेरॉन शरीरात गरजेपेक्षा कमी किंवा जास्त तयार झाल्यास कोणते बदल आणि लक्षणे दिसू शकतात, ते पुढे जाणून घेऊया. 

पुरुषांमध्ये कमी टेस्टोस्टेरॉनची लक्षणे

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असण्याला लो टेस्टोस्टेरॉन (लो-T) किंवा काही परिस्थितींमध्ये हायपोगोनॅडिझम म्हणतात. अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशननुसार, 300 ng/dL पेक्षा कमी टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी मानली जाऊ शकते. मात्र, केवळ एका रक्तचाचणीवरून निदान केले जात नाही. लक्षणे आणि सकाळच्या वेळी केलेल्या एकापेक्षा जास्त चाचण्यांचे निकालही पाहिले जातात.

कमी टेस्टोस्टेरॉन असल्यास खालीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात:

  • हाडांची घनता कमी होणे, ज्यामुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो 
  • लैंगिक इच्छा कमी होणे
  • सतत थकवा किंवा ऊर्जा कमी जाणवणे
  • इरेक्शनमध्ये अडचण
  • स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होणे
  • शरीरातील चरबी वाढणे
  • चिडचिड किंवा मूडमध्ये बदल होणे
  • उदास वाटणे
  • लक्ष केंद्रित करण्यास किंवा स्मरणशक्तीत अडचण येणे
  • काखेतील आणि जननेंद्रियाजवळील केस कमी होणे
  • अंडकोषांचा आकार कमी होणे
  • हॉट फ्लॅशेस किंवा अचानक उष्णता जाणवणे
  • शुक्राणूंची संख्या कमी होणे, ज्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्व किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो

मुलांमध्ये किंवा किशोरवयात टेस्टोस्टेरॉन कमी असल्यास 

किशोरावस्थेतील बदल उशिरा होणे, उंचीची वाढ अपेक्षेपेक्षा कमी किंवा उशिरा होणे, जननेंद्रियांची आणि शरीरावरील केसांची वाढ कमी होणे, आवाज अपेक्षेप्रमाणे जाड न होणे आणि स्नायूंची ताकद कमी राहणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

महिलांमध्ये उच्च टी पातळीची लक्षणे

शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास त्याला हायपरअँड्रोजेनिझम म्हणतात. यामध्ये शरीरात पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते. PCOS हे याचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. अंडाशय किंवा ॲड्रिनल ग्रंथींशी संबंधित समस्या यामागे असू शकतात.  19 वर्षांवरील महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची सामान्य पातळी साधारण 15- 70 ng/dL असू शकते. 

टेस्टोस्टेरॉन जास्त असल्यास खालीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात:

  • चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त, जाड केस येणे
  • आवाज जाड होणे 
  • मुरुम वाढणे
  • स्नायू वाढणे 
  • डोक्यावरील केस पातळ होणे किंवा केस गळणे
  • मासिक पाळी अनियमित होणे किंवा काही काळ पाळी न येणे
  • अंडोत्सर्गात अडचण येऊन गर्भधारणेत अडथळा येणे
  • क्लिटोरिसचा आकार वाढणे 
  • वजन वाढणे किंवा वजन नियंत्रित करण्यात अडचण येणे, विशेषतः PCOS सोबत
  • काही महिलांमध्ये मूडमध्ये बदल होऊ शकतात.

टेस्टोस्टेरॉन कमी होण्याचे कारणे

टेस्टोस्टेरॉन कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही समस्या जन्मापासून असतात, तर काही पुढे जाऊन निर्माण होतात.

जन्मापासून असलेल्या काही समस्या:

  • क्लाइनफेल्टर सिंड्रोम
  • नूनन सिंड्रोम
  • जन्मतः जननेंद्रियांचा विकास नेहमीच्या पद्धतीने न होणे

अंडकोषांशी संबंधित कारणे:

  • अपघात किंवा दुखापतीमुळे अंडकोषाला इजा होणे
  • कर्करोगामुळे अंडकोष काढण्याची शस्त्रक्रिया
  • केमोथेरपी किंवा रेडिएशनसारखे उपचार
  • अंडकोषाचा संसर्ग
  • काही ऑटोइम्यून आजार

इतर आरोग्य समस्या आणि जीवनशैलीशी संबंधित धोके:

  • वाढते वय
  • जास्त वजन किंवा लठ्ठपणा
  • मेटाबॉलिक सिंड्रोम, ज्यामध्ये वाढलेला रक्तदाब, रक्तातील साखर वाढणे, कोलेस्ट्रॉलमध्ये बिघाड आणि पोटाभोवती जास्त चरबी यांसारख्या समस्या असतात
  • पिट्यूटरी ग्रंथीशी संबंधित आजार
  • HIV/AIDS सारखे काही दीर्घकालीन आजार
  • काही औषधांचा दीर्घकाळ वापर, विशेषतः काही अँटीडिप्रेसंट आणि ओपिऑइड पेनकिलर्स 

मला टेस्टोस्टेरॉन पातळी चाचणीची आवश्यकता का आहे?

आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना लैंगिक इच्छा कमी होणे, वजन वाढणे, सतत थकवा जाणवणे किंवा प्रजननाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. यामागे नात्यातील समस्या, ताण, कमी शारीरिक हालचाल, झोपेची कमतरता किंवा आहारातील पोषक घटकांची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. पण हा त्रास बराच काळ राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किशोरावस्थेत शारीरिक वाढ किंवा लैंगिक विकास अपेक्षेप्रमाणे होत नसेल, अंडकोषांना काही दुखापत झाली असेल, अंडकोषांचा आकार किंवा खाजगी भाग नेहमीपेक्षा वेगळा वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा खूप कमी होणे, इरेक्शनमध्ये वारंवार अडचण येणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा गर्भधारणेत अडचण येत असेल तरी तपासणी करून घ्यावी. अशा वेळी युरोलॉजिस्ट किंवा एंडोक्रिनोलॉजिस्ट योग्य मार्गदर्शन करू शकतात.  

महिलांमध्ये पाळी अनियमित होणे, अंडोत्सर्गात अडचण, चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे, मुरुम वाढणे किंवा केस गळणे यांसारखी लक्षणे दिसत असतील तर टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासली जाऊ शकते. विशेषतः PCOS सारख्या समस्यांमध्ये पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण वाढलेले असू शकते.

Testosterone Meaning in Marathi, याचा संबंध फक्त लैंगिक आरोग्याशी नाही. तो स्नायू आणि हाडांचे आरोग्य, लाल रक्तपेशी तयार होणे आणि एकूण शारीरिक आरोग्याशीही संबंधित आहे. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी किंवा जास्त असल्यास त्याचा शरीराच्या इतर कार्यांवरही परिणाम होऊ शकतो.

टेस्टोस्टेरॉन चाचणीची तयारी करत आहे

टेस्टोस्टेरॉनची चाचणी ही साधी ब्लड टेस्ट आहे. मात्र, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने टेस्ट केल्यास निकाल अधिक उपयोगी ठरतो.

योग्य वेळ निवडा

टेस्टोस्टेरॉनची पातळी दिवसभर सारखी राहत नाही. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी सकाळी जास्त असल्यामुळे सकाळी 7 ते 10 वाजण्याच्या दरम्यान टेस्ट करणे योग्य मानले जाते. महिलांमध्येही टेस्ट सकाळी करणे उपयोगी ठरू शकते, मात्र टेस्टची योग्य वेळ कोणत्या कारणासाठी चाचणी केली जात आहे यावर अवलंबून असते. महिलांमध्ये मासिक पाळीच्या चक्रानुसारही टेस्टोस्टेरॉनची पातळी थोडी बदलू शकते, त्यामुळे डॉक्टर योग्य दिवस आणि वेळ सांगू शकतात. 

उपाशी राहणे गरजेचे आहे का?

प्रत्येक टेस्टसाठी उपाशी राहण्याची गरज नसते. मात्र, काही वेळा डॉक्टर उपाशीपोटी टेस्ट करण्यास सांगू शकतात, विशेषतः कमी टेस्टोस्टेरॉनचे निदान करताना. जर फास्टिंग सांगितले असेल, तर टेस्ट सकाळी नाश्ता करण्यापूर्वी करून घेणे सोपे जाते. 

औषधे आणि सप्लिमेंट्सची माहिती द्या

काही औषधे, हार्मोनल औषधे आणि सप्लिमेंट्स टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची, व्हिटॅमिन्सची आणि सप्लिमेंट्सची माहिती डॉक्टरांना द्या. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध बंद करू नका.

चांगली झोप घ्या

टेस्टच्या आदल्या रात्री पुरेशी आणि चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपेची कमतरता किंवा झोपेशी संबंधित विकारांमुळे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. 

खूप जास्त व्यायाम टाळा

टेस्टच्या अगोदर खूप जास्त किंवा दमणारा व्यायाम करण्याची गरज नाही. अतिरिक्त शारीरिक ताणामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी तात्पुरती कमी होऊ शकते. त्यामुळे टेस्टच्या दिवशी नेहमीची हलकी हालचाल ठीक आहे.

पाणी पुरेसे प्या

फास्टिंग सांगितले असेल तरी साधे पाणी साधारणपणे घेता येते. पुरेसे पाणी प्यायल्याने रक्त काढणेही सोपे होऊ शकते. मात्र, फास्टिंग असल्यास चहा, कॉफी, ज्यूस किंवा इतर पेये घेऊ नका.

टेस्टोस्टेरॉन चाचण्यांसाठी प्रक्रिया

टेस्टोस्टेरॉन चाचणीसाठी हाताच्या शिरेतून सुईच्या मदतीने थोडे रक्त घेतले जाते. हे रक्त टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन लॅबमध्ये तपासले जाते. गरजेनुसार टोटल टेस्टोस्टेरॉन आणि फ्री टेस्टोस्टेरॉन तपासले जाऊ शकते.

एकाच टेस्टवर निष्कर्ष काढू नका

जर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी आली, तर त्यावरून लगेच टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेचे निदान केले जात नाही. डॉक्टर लक्षणे आणि सकाळच्या टेस्टचे निकाल एकत्र पाहतात. गरज असल्यास कमी आलेल्या निकालाची खात्री करण्यासाठी दुसऱ्या दिवशी किंवा वेगळ्या दिवशी पुन्हा सकाळी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.

गरजेनुसार इतर हार्मोन्सही तपासले जाऊ शकतात

टेस्टोस्टेरॉन कमी किंवा जास्त का आहे हे समजण्यासाठी डॉक्टर गरजेनुसार LH, FSH, प्रोलॅक्टिन आणि इतर हार्मोन्सचीही तपासणी करू शकतात. यामुळे समस्या अंडकोष, मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथी किंवा हार्मोन्सच्या नियंत्रणाशी संबंधित आहे का हे समजण्यास मदत होते.

निष्कर्ष

  • टेस्टोस्टेरॉन हा फक्त पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित हार्मोन नाही. हाडे मजबूत ठेवणे, स्नायूंचे प्रमाण आणि ताकद टिकवणे, लाल रक्तपेशी तयार होणे, लैंगिक इच्छा आणि प्रजनन आरोग्य यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पुरुषांप्रमाणेच महिलांच्या शरीरातही टेस्टोस्टेरॉनची गरज असते. महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा काही भाग इस्ट्रोजेन तयार करण्यासाठी वापरला जातो, आणि इस्ट्रोजेन हा मासिक पाळी, प्रजननक्षमता, हाडांचे आरोग्य आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचा हार्मोन आहे.

त्यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी किंवा जास्त असल्याची लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने पातळी तपासून घेणे चांगले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टेस्टोस्टेरॉन पातळी चाचणी दरम्यान काय होते?

टेस्टोस्टेरॉन चाचणीमध्ये काही धोके आहेत का?

सामान्य टेस्टोस्टेरॉन पातळी काय आहे?

माझ्याकडे टेस्टोस्टेरोन कमी असल्यास माझ्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कशी वाढवायची?

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि ती वैद्यकीय सल्ला मानू नये. योग्य तपासणी आणि वैयक्तिक उपचारांसाठी प्रमाणित फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer