Recurrent Pregnancy Loss म्हणजे काय? वारंवार गर्भपात होण्याची कारणे आणि उपचार पद्धती

Published on: 21 November 2026 - Updated on: 21 November 2026
Dr. Payal Tiwari

Authored By Dr. Payal Tiwari

Gynaecologist & IVF Specialist

10+ years of experience

Dr. Amol Naik

Reviewed By Dr. Amol Naik

MBBS

Sr. Executive Director

14+ Years

Expert verified

Overview

वारंवार होणारा गर्भपात हा शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही खूप त्रासदायक अनुभव असू शकतो. काही महिलांमध्ये त्यामागचे कारण तपासणीत स्पष्ट होते ;तर काही प्रकरणांमध्ये अनेक तपासण्या करूनही ठोस कारण समजत नाही. अनेकदा गैरसमज, भीती आणि चिंता यामुळे पुढे पुन्हा गर्भधारणेचा प्रयत्न करण्याबाबतही संभ्रम निर्माण होतो. मात्र योग्य तपासणी, आवश्यक उपचार आणि वैद्यकीय मार्गदर्शनाच्या मदतीने पुढील गर्भधारणेचे नियोजन करता येऊ शकते. 

Recurrent Pregnancy Loss म्हणजे काय?

दोन किंवा त्यापेक्षा जास्त गर्भधारणांचे नैसर्गिकरीत्या होणारे नुकसान पुन्हा पुन्हा होत असेल, तर त्याला recurrent pregnancy loss म्हणतात. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनच्या 2026च्या मार्गदर्शनानुसार दोन किंवा अधिक गर्भधारणांचे नुकसान झाले असल्यास या स्थितीचा विचार करून कारणांचा शोध सुरू करता येतो. ही नुकसानं सलगच झाली पाहिजेत असे नाही; मध्ये एखादी गर्भधारणा निरोगीपणे सुरू राहिली असली तरीही त्यानंतर पुन्हा गर्भपात झाल्यास त्याचा वैद्यकीय इतिहास महत्त्वाचा ठरतो. Recurrent pregnancy loss in Marathi याला साध्या भाषेत “वारंवार होणारा गर्भपात” किंवा “पुन्हा पुन्हा गर्भधारणा टिकून न राहणे” असे म्हणता येईल. 

वारंवार गर्भपात होण्याची कारणे कोणती?

Recurrent pregnancy loss causes अनेक असू शकतात. काही महिलांमध्ये एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात, तर काही प्रकरणांमध्ये तपासण्या करूनही नेमके कारण समोर येत नाही. त्यामुळे वारंवार गर्भपात झाला म्हणून त्यामागे आईचीच काही चूक आहे, असे मानणे योग्य नाही. 

  • गर्भातील क्रोमोसोममधील असामान्यता: गर्भाच्या क्रोमोसोमची संख्या किंवा रचनेत बदल झाल्यास गर्भाची वाढ थांबून गर्भपात होऊ शकतो.
  • Parental chromosomal abnormalities: पालकांच्या क्रोमोसोममधील असामान्यता म्हणजे आई किंवा वडिलांच्या क्रोमोसोममध्ये काही बदल, कमतरता किंवा अतिरिक्त क्रोमोसोम असणे. हा बदल गर्भाला मिळाल्यास गर्भधारणा होण्यात अडचणी येऊ शकतात किंवा गर्भपात होऊ शकतो. 
  • गर्भाशयातील रचनात्मक समस्या: गर्भाशयाची जन्मजात रचना वेगळी असणे, सेप्टम, पॉलिप किंवा काही प्रकारचे फायब्रॉइड्स यांचा गर्भपाताशी संबंध असू शकतो.
  • रक्त गोठण्याशी संबंधित विकार आणि APS: अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम (APS) आणि काही थ्रोम्बोफिलियामध्ये रक्ताच्या गाठी होण्याची प्रवृत्ती वाढू शकते, ज्यामुळे काही महिलांमध्ये वारंवार गर्भपाताचा धोका वाढू शकतो. 
  • थायरॉईडचे विकार: विशेषतः उपचार न केलेला हायपोथायरॉइडिझम गर्भपाताचा धोका वाढवू शकतो.
  • नियंत्रणात नसलेला मधुमेह: रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण नसल्यास गर्भधारणेच्या परिणामांवर परिणाम होऊ शकतो.
  • इतर एंडोक्राइन विकार: प्रोलॅक्टिन किंवा इतर हार्मोन्समधील काही विकार काही महिलांमध्ये गर्भपाताशी संबंधित असू शकतात.
  • संसर्ग आणि प्रतिकारशक्तीशी संबंधित घटक: काही संसर्ग किंवा इम्यूनोलॉजिकल घटकांचा संभाव्य संबंध आढळला आहे; मात्र त्यांना प्रत्येक recurrent miscarriageचे निश्चित कारण मानता येत नाही.
  • पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित घटक: धूम्रपान, जास्त मद्यपान आणि काही पर्यावरणीय घटक गर्भधारणेच्या परिणामांवर परिणाम करू शकतात. 
  • कारण न सापडणे: सर्व तपासण्या करूनही काही महिलांमध्ये गर्भपाताचे स्पष्ट कारण समोर येत नाही. अशा वेळी त्याला Unexplained recurrent pregnancy loss म्हटले जाते. 

    Factors Associated With Recurrent Pregnancy Loss
     

Recurrent Pregnancy Loss ची लक्षणे कोणती?

Recurrent pregnancy loss symptoms  ही साधारण एका सामान्य गर्भपातासारखीच असतात. महत्त्वाचं म्हणजे, काही वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवताही गर्भधारणा संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे नियमित तपासणी महत्त्वाची ठरते.

  • Vaginal bleeding 

हे सर्वात सामान्य आणि लवकर दिसणारं लक्षण आहे. सुरुवातीला हलकं स्पॉटिंग असू शकतं, जे पुढे जास्त रक्तस्रावात बदलू शकतं. कधीकधी यासोबत गुठळ्याही बाहेर पडू शकतात. मात्र गर्भावस्थेत रक्तस्राव झाला म्हणजे गर्भपात होतोच असे नाही; इतर कारणांमुळेही तो होऊ शकतो. 

  • पोटदुखी आणि abdominal cramps 

मासिक पाळीत होणाऱ्या दुखण्यासारखेच, पण कधीकधी त्यापेक्षा जास्त तीव्र क्रॅम्प्स पोटाच्या खालच्या भागात, पेल्विक भागात किंवा पाठीच्या खालच्या भागात जाणवू शकतात.

  • Pregnancy symptoms मध्ये बदल 

मळमळ, स्तनांमध्ये जडपणा किंवा थकवा यांसारखी गर्भधारणेची लक्षणं अचानक आणि अपेक्षेपेक्षा लवकर कमी होणे, हे देखील एक महत्त्वाचं संकेत असू शकतं.

प्रत्येक pregnancy loss मध्ये लक्षणे सारखी असतात का?

नाही. प्रत्येक pregnancy loss मध्ये लक्षणे वेगळी असू शकतात. काही महिलांना रक्तस्राव आणि पोटदुखी स्पष्टपणे जाणवते, तर काही वेळा कोणतीही लक्षणे नसतात आणि नियमित अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाची वाढ थांबलेली आढळते. म्हणून recurrent pregnancy loss symptoms दिसतातच असे नाही; योग्य निदानासाठी डॉक्टरांकडून तपासणी करणे महत्त्वाचे आहे. 

Recurrent Pregnancy Loss चे Diagnosis कसे केले जाते?

Recurrent pregnancy loss diagnosis साठी डॉक्टर काही ठरलेल्या टप्प्यांत तपासणी करतात, जेणेकरून गर्भपातामागचं नेमकं कारण शोधता येईल.

  • Medical आणि pregnancy history 

सुरुवातीला मागील गर्भधारणांमध्ये गर्भपात कधी आणि कितव्या आठवड्यात झाला, रक्तस्राव किंवा इतर लक्षणे होती का, याआधी निरोगी गर्भधारणा झाली आहे का, तसेच आईला थायरॉईड, मधुमेह किंवा इतर आजार आहेत का, याची माहिती घेतली जाते. कुटुंबातील काही आनुवंशिक आजारांचाही विचार केला जातो. 

  • Blood tests 

थायरॉईड, डायबेटिस आणि अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम (APS) तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. APS च्या निदानासाठी ल्युपस अँटिकोॲग्युलंट, अँटीकार्डिओलिपिन आणि बीटा-2 ग्लायकोप्रोटीन अँटीबॉडीजची तपासणी केली जाते. निश्चित निदानासाठी ही टेस्ट किमान 12 आठवड्यांच्या अंतराने दोनदा पॉझिटिव्ह येणे आवश्यक असते. 

  • Genetic testing 

गर्भपात झालेल्या गर्भातील ऊतींचे क्रोमोसोम तपासणी करून गर्भपातामागे काही आनुवंशिक असामान्यता होती का, हे समजू शकते. काही परिस्थितीत आई-वडिलांची कॅरिओटाइप चाचणी (Karyotype test) करून त्यांच्या क्रोमोसोमच्या संख्येत किंवा रचनेत काही बदल आहेत का, हेही तपासले जाते. 

  • Ultrasound आणि uterine evaluation 

गर्भाशयाच्या रचनेत कोणती समस्या आहे का जसं की फायब्रॉइड्स, सेप्टम किंवा चिकटलेले टिश्यू, हे तपासण्यासाठी पेल्विक अल्ट्रासाऊंड, सलाईन सोनोहिस्टेरोग्राम किंवा हिस्टेरोस्कोपी केली जाते.

  • आवश्यकतेनुसार इतर डायग्नोस्टिक टेस्ट्स

काही वेळा गर्भपात झालेल्या टिश्यूचीही तपासणी केली जाते, जेणेकरून त्या विशिष्ट गर्भधारणेत गुणसूत्रांची समस्या होती का हे कळू शकेल. लक्षणे किंवा वैद्यकीय इतिहासानुसार डॉक्टर इन्सुलिन रेसिस्टन्स, प्रोलॅक्टिन, थायरॉईड किंवा मधुमेहासाठी HbA1cसारख्या अतिरिक्त तपासण्या सुचवू शकतात. प्रत्येक महिलेला या सर्व तपासण्या करणे आवश्यक नसते. 
 How Recurrent Pregnancy Loss Is Investigated

Recurrent Pregnancy Loss वर कोणते उपचार केले जातात?

Recurrent pregnancy loss treatment हे गर्भपातामागे आढळलेल्या कारणानुसार ठरते. सर्व महिलांना एकच उपचार दिला जात नाही. 

  • रक्त पातळ करणारी औषधे: अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम (APS) असल्यास लो-डोस ॲस्पिरिन आणि हेपरिन इंजेक्शन्स एकत्र दिली जातात. ही पद्धत APS असलेल्या महिलांमध्ये प्रभावी ठरलेली आहे.
  • गर्भाशयाच्या रचनेत समस्या असल्यास: फायब्रॉइड्स, सेप्टम किंवा चिकटलेले टिश्यू हिस्टेरोस्कोपीसारख्या छोट्या शस्त्रक्रियेने काढले जातात.
  • जेनेटिक समस्या असल्यास: जेनेटिक काउंसलिंग दिलं जातं, आणि काही वेळा IVF सोबत भ्रूणांची जेनेटिक तपासणी (PGT) करण्याचा सल्ला दिला जातो.
  • थायरॉईड किंवा हार्मोनल असंतुलन असल्यास: थायरॉईडची समस्या असल्यास त्यासाठी औषधं दिली जातात, कारण यावर उपचार केल्यास पुढील गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.
  • प्रोजेस्टेरॉनचा वापर: वारंवार गर्भपाताचा इतिहास असलेल्या महिलेला सुरुवातीच्या गर्भावस्थेत रक्तस्राव होत असल्यास डॉक्टर प्रोजेस्टेरॉन देण्याचा विचार करू शकतात. मात्र प्रत्येक महिलेला त्याची गरज असतेच असे नाही. 
  • कारण सापडलं नाही (अनएक्सप्लेन्ड RPL): काही महिलांमध्ये सर्व तपासण्या करूनही recurrent pregnancy loss treatment साठी ठोस कारण सापडत नाही. अशा वेळी कोणतंही एक औषध निश्चितपणे प्रभावी ठरतं असं सिद्ध झालेलं नाही पण पुढील गर्भधारणेत लवकर आणि वारंवार अल्ट्रासाऊंड करून बारकाईने लक्ष ठेवणं याचा भावनिक आणि वैद्यकीय दोन्ही दृष्टीने फायदा होतो.
  • इतर उपचार: इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा काही विशिष्ट हार्मोनल समस्या असल्यास त्यानुसार उपचार केले जाऊ शकतात. 

Recurrent Pregnancy Loss नंतर पुढील Pregnancy कशी Plan करावी?

RPL नंतर पुढची गर्भधारणा ठरवताना मनात भीती आणि चिंता असणं अगदी स्वाभाविक आहे. पण योग्य नियोजन केल्यास ही गर्भधारणा सुरक्षितपणे पुढे नेता येते. 

  • गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या: गरजेनुसार आई-वडिलांची कॅरिओटाइप चाचणी, Antiphospholipid Syndrome (APS)साठी रक्ताच्या चाचण्या, Thyroid-Stimulating Hormone (TSH)ची तपासणी, मधुमेहाचा धोका असल्यास Glycated Hemoglobin (HbA1c)ची चाचणी आणि गर्भाशयाची रचना तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड किंवा इतर आवश्यक तपासण्या केल्या जाऊ शकतात. 
  • आढळलेल्या कारणांवर उपचार करा: थायरॉईड, डायबेटिस, APS किंवा गर्भाशयातील समस्या असल्यास त्यांचे योग्य नियंत्रण करा.
  • फॉलिक ॲसिड सुरू करा: गर्भधारणेचे नियोजन करताना रोज 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ॲसिड घेणे सुरू करावे; ते 3 महिना आधी सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. 
  • निरोगी जीवनशैली ठेवा: संतुलित आहार, योग्य वजन, नियमित हलका व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा: पुढील गर्भधारणेपूर्वी आणि गर्भावस्थेत हे पूर्णपणे टाळणे योग्य आहे.
  • गर्भधारणा झाल्यावर लवकर तपासणी करा: सुरुवातीपासून नियमित डॉक्टरांचा फॉलो-अप आणि आवश्यक अल्ट्रासाऊंड करून घ्या.
  • मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या: मागील गर्भपातांनंतर भीती किंवा चिंता वाटत असल्यास समुपदेशन किंवा भावनिक आधार घ्या.

Recurrent Pregnancy Loss चा धोका कमी करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Recurrent pregnancy loss पूर्णपणे टाळता येईलच असे नाही, विशेषतः त्यामागे क्रोमोसोममधील समस्या असल्यास. मात्र काही आरोग्यविषयक घटक नियंत्रणात ठेवून पुढील गर्भधारणेसाठी शरीराची योग्य तयारी करता येते.

  • आरोग्यदायी आहार आणि lifestyle

गर्भधारणेपूर्वी हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी-कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध-दुग्धजन्य पदार्थ, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ यांचा संतुलित आहार घ्या. फॉलिक ॲसिडही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करा. नियमित हलका व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवण्याकडे लक्ष द्या. केगल व्यायाम केल्याने पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. 

धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान टाळणे महत्त्वाचे आहे. फक्त महिलाच गर्भपातासाठी जबाबदार असतात असे नाही; पुरुषांचे वय, जीवनशैली आणि काही शुक्राणूंशी संबंधित घटकांचाही गर्भपाताशी संबंध असू शकतो. विशेषतः धूम्रपान, प्रदूषण किंवा काही इतर कारणांमुळे शुक्राणूंच्या DNAला नुकसान होऊ शकते, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पुढील गर्भधारणेपूर्वी दोन्ही जोडीदारांनी आरोग्यदायी जीवनशैली ठेवणे महत्त्वाचे आहे  

  • वजन आणि इतर health conditions व्यवस्थापित करणे

अतिवजन किंवा कमी वजन असल्यास ते योग्य पातळीवर आणण्याचा प्रयत्न करा. PCOD/PCOS, थायरॉईड किंवा डायबेटिस यांसारख्या आरोग्याच्या समस्या असल्यास गर्भधारणेपूर्वी त्यांचे योग्य नियंत्रण ठेवणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

  • नियमित medical follow-up

मागील गर्भपातांचे कारण आणि केलेल्या तपासण्यांनुसार डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या. पुढील recurrent pregnancy loss pregnancy मध्ये गर्भधारणा झाल्यानंतर लवकर संपर्क साधल्यास आवश्यक तपासण्या, अल्ट्रासाऊंड आणि पुढील मॉनिटरिंगचे नियोजन करता येते.

Recurrent Pregnancy Loss बद्दल सामान्य गैरसमज

गैरसमज 1: वारंवार गर्भपात होण्यासाठी महिलाच जबाबदार असते.
सत्य: नेहमीच असे नसते. गर्भातील किंवा पालकांच्या क्रोमोसोममधील बदल, APS, गर्भाशयाची रचना, थायरॉईड किंवा इतर कारणांमुळेही गर्भपात होऊ शकतो. पुरुषांच्या वयाचा आणि शुक्राणूंच्या DNAशी संबंधित काही घटकांचाही संबंध असू शकतो. 

गैरसमज 2: एकदा recurrent pregnancy loss झाला म्हणजे पुढची गर्भधारणा टिकणार नाही.
सत्य: कारण सापडले नसले तरी पुढील गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता चांगली असू शकते. गर्भधारणेत अडचण, आनुवंशिक कारण किंवा इतर प्रजनन समस्या असल्यास डॉक्टर परिस्थितीनुसार IVF, IUI किंवा इतर ART पद्धतींचा विचार करू शकतात.  

गैरसमज 3: व्यायाम, बेडरेस्ट किंवा सप्लिमेंट्स घेतल्याने गर्भपात टाळता येतो.

सत्य: हलका व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण गर्भपात रोखत नाही. पूर्ण बेडरेस्ट किंवा कोणतेही सप्लिमेंट गर्भपात टाळण्याची हमी देत नाही. 

गैरसमज 4: वारंवार गर्भपात टाळण्यासाठी ॲस्पिरिन किंवा इतर रक्त पातळ करणारी औषधे सर्वांना घ्यावी लागतात.
सत्य: अशी औषधे विशेषतः APSसारखे कारण आढळल्यास वापरली जाऊ शकतात. कारण नसताना ती घेण्याचा फायदा सिद्ध झालेला नाही.

Reference

  1. American Society for Reproductive Medicine Practice Committee. Recurrent pregnancy loss: a committee opinion (2026). Fertility and Sterility. 2026;125:1023–1041. : Source
  2. American College of Obstetricians and Gynecologists (ACOG). Repeated Miscarriages : Source

Frequently Asked Questions

Recurrent pregnancy loss म्हणजे काय?

वारंवार गर्भपात होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

Recurrent pregnancy loss चे diagnosis कसे केले जाते?

Recurrent pregnancy loss साठी कोणते tests केले जातात?

Recurrent pregnancy loss वर उपचार करता येतात का?

Antiphospholipid syndrome मुळे recurrent pregnancy loss होऊ शकतो का?

Recurrent pregnancy loss नंतर पुन्हा healthy pregnancy शक्य आहे का?

पुढील pregnancy साठी recurrent pregnancy loss नंतर कोणती काळजी घ्यावी?

© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved.